आर्टिफिशल इंटेलिन्जन्स टुल्सद्वारे व्यावसायिकाची फसवणुक

मुलाला बलात्काराच्या गुन्ह्यांत अटक केल्याचे सांगून गंडा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२४ सप्टेंबर २०२४
मुंबई, – आर्टिफिशल इंटेलिन्जन्स टुल्सच्या माध्यमातून दहिसर येथील एका व्यावसायिकाची अज्ञात सायबर ठगांनी ब्रिटन पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणुकीचा प्रयत्न केला. लंडन येथे वास्तव्यास असलेल्या त्यांच्या मुलासह इतर तिघांना बलात्काराच्या गुन्ह्यांत अटक केली असून प्रकरण मिटविण्यासाठी त्यांच्याकडून साठ हजार रुपये घेऊन आणखीन पैशांची मागणी केली. मात्र वेळीच फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आल्यांनतर त्यांनी पैसे पाठविलेल्या बँक खात्यातील व्यवहार थांबवून दहिसर पोलिसांनी साठ हजाराची ही रक्कम जप्त केली आहे. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या कामगिरीबाबत दहिसर पोलिसांचे वरिष्ठांकडून कौतुक होत आहे.

यातील तक्रारदार व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत दहिसर परिसरात राहतात. त्यांचा मुलगा लंडन येथे वास्तव्यास असून तिथेच तो नोकरी करतो. काही दिवसांपूर्वी त्यांना एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन कॉल आला होता. यावेळी समोरुन बोलणार्‍या व्यक्तीने तो लंडन पोलीस बोलत असल्याचे सांगितले. लंडन येथे एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाला असून याच गुन्ह्यांत लंडन पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. त्यात त्यांच्या मुलाचा समावेश आहे. याच गुन्ह्यांत चारही आरोपी कोठडीत असून त्यांची चौकशी सुरु आहे. या चौघांनी पिडीत तरुणीवर बलात्कार केल्याची कबुली दिली आहे. या माहितीने त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाची चौकशी करुन त्याच्याशी बोलायचे आहे, त्याच्याशी बोलणे करुन द्या अशी विनंती केली होती. मात्र या व्यक्तीने त्यांच्या मुलाशी बोलणे करुन देण्यास नकार देत त्यांच्याकडे प्रकरण मिटविण्यासाठी पैशांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी कुठलीही शहानिशा न करता त्याने दिलेल्या बँक खात्यात साठ हजार रुपये पाठवून दिले होते.

काही वेळानंतर त्याने त्यांच्या मुलाशी त्यांचे बोलणे करुन दिले होते. यावेळी फोनवर बोलणारा मुलगा सतत रडत होता. पैसे देऊन प्रकरण मिटवून त्याला बाहेर काढण्याची विनंती करत होता. मात्र तक्रारदाराने गुजरातीमध्ये संभाषण केल्यानंतर त्याने फोन कट केला. सुरुवातीला त्यांना हा प्रकार संशयास्पद वाटला, मात्र मुलाविषयी माहिती ऐकून त्यांना काहीच सुचत नव्हते. काही वेळानंतर त्यांना पुन्हा दुसर्‍या व्यक्तीने फोन करुन त्यांच्याशी हिंदीतून संभाषण सुरु केले होते. यावेळी त्याने हिंदीतून बोलणार्‍या व्यक्तीची चौकशी केली असता त्याने त्यांना त्यांची भाषा समजावी म्हणून एका भारतीय व्यक्तीची मदत घेतल्याचे सांगितले. या व्यक्तीने त्यांच्याकडे आणखीन पैशांची मागणी केली होती. दिड लाख रुपये दिल्यास त्यांच्या मुलाला या प्रकरणात बाहेर काढू असे सांगितले. मात्र त्यांनी दिडऐवजी त्यांना ७५ हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलीला फोन करुन शहानिशा केली असता त्यांचा मुलगा घरीच असून झोपल्याचे समजले होते.

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी दहिसर पोलिसांना ही माहिती सांगितली. या माहितीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला. ज्या बँक खात्यात तक्रारदाराने साठ हजार रुपये पाठविले होते, ते बँक खाते गोठविण्यात पोलिसांना यश आले. ही रक्कम पुन्हा त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली. प्राथमिक तपासात सायबर ठगांनी आर्टिफिशल इंटेलिन्जन्स टुल्सच्या माध्यमातून ही फसवणुकीचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांचा प्रयत्न फसला गेला.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page