पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा वयोवृद्धाकडून विनयभंग
मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देत बाथरुममध्ये कोंडले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 मार्च 2025
मुंबई, – मोबाईलवर वायफाय सुरु करण्याचा बहाणा करुन एका पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा तिच्याच शेजारी राहणार्या 62 वर्षांच्या वयोवृद्धाने विनयभंग केला. तिने पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने तिला बेदम मारहाण करुन आवाज केल्यास जिवे मारण्याची धमकी देत त्याने तिला बाथरुममध्ये कोंडून ठेवल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच वयोवृद्ध आरोपीला एमएचबी पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
बळीत मुलगी ही बोरिवली परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तिच्याच शेजारी आरोपी वयोवृद्ध राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. मंगळवारी 18 मार्चला रात्री आठ वाजता ही मुलगी तिच्या घरी होती. यावेळी आरोपीने मोबाईलमध्ये वायफाय सुरु करण्याचा बहाणा करुन तिला त्याच्या घरी बोलाविले होते. त्यामुळे ती त्याच्या घरी गेली होती. यावेळी त्याने तिला जोरात धक्का देऊन बेडरुममध्ये ढकळले. तिच्याशी अश्लील चाळे करुन त्याने तिचा विनयभंग केला होता. तिने त्याला धक्का देऊन तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिला मागून पकडून हाताने आणि झाडूने बेदम मारहाण केली होती. आवाज केल्यास जिवे मारण्याची धमकी देऊन त्याने तिला बाथरुममध्ये बंद केले होते.
हा प्रकार नंतर उघडकीस येताच या मुलीच्या कुटुंबियांनी एमएचबी पालिसांत धाव घेतली होती. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून बळीत मुलीने आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी विनयभंगासह मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देणे आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच रात्री उशिरा आरोपी वयोवृद्धाला पोलिसांनी अटक केली.