झोपेतच शिक्षाचालकाच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून हल्ला
हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत आरोपीस अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
17 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – झोपेतच एका 59 वर्षांच्या रिक्षाचालकाच्या डोक्यात त्याच्याच परिचित आरोपीने पेव्हर ब्लॉकने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात मुरलीधर रामसुंदर वर्मा हा जखमी झाला असून त्याला राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून सोनू किसन चरचरे या 35 वर्षांच्या आरोपीला अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला विक्रोळीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना गुरुवारी रात्री उशिरा दिड वाजता विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील ब्लूमेन इमारतीच्या बाजूला घडली. मुरलीधर वर्मा हा रिक्षाचालक असून दिवसभर रिक्षा चालवून तो रात्रीच्या वेळेस पार्किंगमध्ये रिक्षा लावून रिक्षामध्ये झोपत होता. गुरुवारी रात्री उशिरा दिड वाजता तो त्याच्या रिक्षामध्ये झोपला होता. यावेळी तिथे सोनू आला. त्याने जवळचा पेव्हर ब्लॉक उचलून त्याच्या डोक्यात घातला होता. त्यात त्याच्या डोक्यासह चेहर्याला दुखापत झाली होती.
हा प्रकार इतर रिक्षाचालकाच्या लक्षात येताच त्यांनी जखमी झालेल्या मुरलीधर वर्माला तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. उपचारानंतर त्याला सोडून देण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पार्कसाईट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मुरलीधर वर्माची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सोनू चरचरे याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच त्याला विक्रोळी येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला दुसर्या दिवशी कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. काहीही कारण नसताना त्याने त्याच्यावर पेव्हर ब्लॉकने हल्ला केल्याचे पोलिसांना तपासात उघडकीस आले.