गरीबांना मदतीचे आवाहन करणार्या दोन तोतया पोलिसांना अटक
गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 24 तासांत दोघांवर अटकेची कारवाई
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
17 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – दिवाळीनिमित्त गरीब लोकांना जेवणासह कपडे देण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करुन एका वयोवृद्धाची दोन तोतया पोलिसांनी फसवणुक केली, मात्र गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या दोन्ही तोतया आरोपींना सांताक्रुज पोलिसांच्या एका विशेष पथकाने शिताफीने अटक केली. राधेश्याम गरवरनाथ चौहाण ऊर्फ चव्हाण आणि दशरथ दिपनाथ व्यास अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मध्यप्रदेशातील रहिवाशी आहे. या दोघांविरुद्ध यापूर्वीही पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणुक केल्याचा आरोप आहे. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
आनंदजी सुरेश जोशी हे 63 वर्षांचे वयोवृद्ध सांताक्रुज येथील एस. व्ही रोड, दिलखुश अपार्टमेंटमध्ये राहतात. ते योगा प्रशिक्षण क्लासेसच्या माध्यमातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. बुधवारी दुपारी तीन वाजता ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांच्या घरी दोन व्यक्ती आले. या दोघांनी पोलीस गणवेश घातला होता, आपण विलेपार्ले पोलीस ठाण्यातून आलो असून दिवाळीनिमित्त गरीब लोकांना जेवणासह कपडे देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी तुम्ही आर्थिक मदत करावी अशी विनंती केली. यावेळी त्यांनी त्यांच्या सोसायटीच्या काही सभासदांनी आर्थिक मदत केल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्यांना ऑनलाईन दोन हजार रुपये पाठविले होते. त्यानंतर ते दोघेही तेथून निघून गेले.
काही वेळानंतर त्यांना एका सभासदाकडून संबंधित दोन्ही व्यक्ती तोतया पोलीस असून त्यांनी अशाच प्रकारे इतरांकडे पैशांची मागणी केल्याचे सांगितले. हा प्रकार समजताच त्यांनी घडलेला प्रकार सांताक्रुज पोलिसांना सांगून दोन्ही तोतया पोलिसांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तोतयागिरी करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असतानाच अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त मारुती पंडित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश शिंदे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार सावंत पोलीस हवालदार अभिषेक कर्ले, पोलीस शिपाई श्रीनिवास चिला, मारुती गावडे, प्रसाद यादव यांनी दशरथ व्यास आणि राधेश्याम चौहाण या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. ते दोघेही मध्यप्रदेशच्या उज्जैन आणि आगरमलवाचे रहिवाशी असून सध्या भिवंडीच सरोळी परिसरात राहत होते. ते दोघेही पोलीस असल्याची बतावणी करुन अनेकांची फसवणुक करत होते. त्यांच्याविरुद्ध मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात अशाच प्रकारे तोतयागिरी करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या दोघांकडून पोलिसांनी एक बाईक, गुन्ह्यांत वापरलेले पोलीस गणवेश आदी मुद्देमाल जप्त केला आहे.
अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या चौकशीतून अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.