अल्पवयीन मुलीवर बास्केटबॉल प्रशिक्षकाकडून लैगिंक अत्याचार
गुन्हा दाखल होताच आरोपी प्रशिक्षकाला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
17 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – अल्पवयीन मुलीवर तिच्याच बास्केटबॉल प्रशिक्षकाने लैगिंक अत्याचार करुन तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ बनविल्याची धक्कादायक घटना नागपाडा परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी प्रशिक्षकाला नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर पिडीत मुलीचे अश्लील फोटोसह व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकीच आरोपी प्रशिक्षकाने दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
अठरा वर्षांची पिडीत तरुणी ही ग्रँटरोड येथे राहत असून सध्या ती शिक्षण घेते. 33 वर्षांचा आरोपी हा तिचा बास्केटबॉल प्रशिक्षक आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली बास्केटबॉलचे प्रशिक्षण घेत असताना तो अनेकदा तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र तो सतत तिच्याशी जवळीक साधून अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करत होता. ती सतरा वर्षांची अल्पवयीन असल्याचे माहित असताना त्याने 4 जून 2024 ते 1 जुलै 2025 या कालावधीत तिला त्याच्या मित्राच्या घरी नेले होते. तिथेच त्याने तिच्याशी शारीरिक सुखाची मागणी केली होती,
तिने नकार देताच त्याने तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. त्यांच्यातील शारीरिक संबंधाचे तिचे अश्लील फोटोसह व्हिडीओ काढले होते. ही माहिती कोणालाही सांगितली तर त्याने तिचे अश्लील फोटोसह व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकीच दिली होती. बदनामीच्या भीतीपोटी तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. त्यानंतरही तो तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे तिने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता.
दोन दिवसांपूर्वी ती नागपाडा पोलीस ठाण्यात गेली होती, तिने तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी बास्केटबॉल प्रशिक्षकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत तिच्या तक्रारीवरुन आरोपी प्रशिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच 33 वर्षांच्या आरोपी प्रशिक्षकाला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याने अशाच प्रकारे इतर काही मुलींशी लैगिंक चाळे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.