बाबा सिद्धीकी हत्येप्रकरणी २६ आरोपींवर मोक्कांतर्गत गुन्हा

गॅगस्टर अनमोल बिष्णोईसह तिघेजण वॉण्टेड आरोपी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० नोव्हेंबर २०२४
मुंबई, – माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी ऊर्फ झियाउद्दीन अब्दुल रहिम सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सर्व २६ आरोपींविरुद्घ मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व आरोपींना सोमवारी दुपारी मोक्का कोर्टात हजर केले जाणार आहे. या गुन्ह्यांत मोस्ट वॉण्टेड गॅगस्ट अनमोल बिष्णोईसह शुभम रामेश्‍वर लोणकर आणि झिशान मोहम्मद अख्तर या तिघांना वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले असून या तिघांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यातील अनमोलला विदेशात अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्याचा ताबा मिळावा यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे.

वांद्रे येथील खेरवाडी जंक्शन परिसरात माजी आमदार झिशान सिद्धीकी यांचे एक खाजगी कार्यालय आहे. याच कार्यालयातून १२ ऑक्टोंबरला रात्री बाबा सिद्घीकी हे घरी जाण्यासाठी निघाले होते. यावेळी तिथे आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात बाबा सिद्धीकी यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच त्याचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला होता. हा तपास हाती येताच गोळीबारानंतर पळून जाणार्‍या गुरमेल बलजीत सिंग आणि धर्मराज राधे कश्यप या दोन्ही शूटरला पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन पिस्तूल, एक मॅगझीन, २८ जिवंत काडतुसे जप्त केले होते. त्यांच्या चौकशीनंतर त्यांच्या इतर सहकार्‍यांची नावे समोर आली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने पुणे, पंजाब, उत्तरप्रदेशासह विविध ठिकाणी छापे इतर २४ आरोपींना अटक केली होती.

त्यापैकी प्रविण रामेश्‍वर लोणकरला १३ ऑक्टोंबर, हरिशकुमार बालकराम निशाद १५ ऑक्टोंबर, नितीन गौतम सप्रे, प्रदीप दत्तू ठोंबरे, चेतन दिलीप पारधी, संभाजी किसन पारधी, राम फुलचंद कनोजिया यांना १८ ऑक्टोंबर, भगवतसिंग ओमसिंगला २० ऑक्टोंबर, अमीत हिसमसिंग कुमार, रुपेश राजेंद्र मोहोळ करण राहुल साळवे, शिवम अरविंद कोहाड यांना २३ ऑक्टोंबर, सुजीत सुशील सिंगला २५ ऑक्टोंबर, गौरव विलास आपुणे ६ नोव्हेंबर, आदित्य राजू गुळणकर आणि रफिक नियाज शेख ७ नोव्हेंबर, शिवकुमार गौतम ऊर्फ शिवा बालकिशन गौतम, अनुराग राधेश्याम कश्यप, ज्ञानप्रकाश प्रदीपकुमार त्रिपाठी, आकाश बृजकुमार श्रीवास्तव आणि अखिलेंद्र प्रतापसिंह सुरेशसिंह या पाचजणांना ११ नोव्हेंबर, आकाशदिप कारजसिंग गिलला १६ नोव्हेंबर, सलमानभाई इक्बालभाई बोहराला १७ नोव्हेंबर तर सुमीत दिनकर वाघला २२ नोव्हेंबरला अटक झाली होती. याच गुन्ह्यांत ते सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या आरोपींविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई पोलिसांनी सुरु केली होती.

अखेर शनिवारी अटक केलेल्या २६ आरोपीविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत या सर्वांना सोमवारी अटक करुन मोक्का कोर्टात हजर केले जाणार आहे. पोलीस कोठडीनंतर या सर्वांची समोरासमोर पुन्हा चौकशी करुन जबानी नोंदविणयात येणार आहे. बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचे आदेश मोस्ट वॉण्टेड आरोपी अनमोल बिष्णेाईने दिल्याचे आतापर्यंतच्या तपासात उघडकीस आले होते. त्यानेच शुभम लोणकर आणि झिशान मोहम्मद अख्तर यांच्यासह इतर आरोपींच्या मदतीने हा कट यशस्वी केला होता. त्यामुळे अनमोलसह शुभम आणि झिशान या तिघांना वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले आहे. अनमोलला अमेरिकेत अटक केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरु आहे. इतर दोन आरोपी अद्याप फरार असल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page