अस्तिस्वात नसलेल्या कंपनीच्या २१० कर्मचार्‍यांना कर्ज देऊन फसवणुक

चार कोटीच्या फसवणुकीप्रकरणी सहकारी बँकेच्या पदाधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ ऑगस्ट २०२६
मुंबई, – अस्तिस्ताव नसलेल्या दोन कंपनीच्या २१० कर्मचार्‍यांना सुमारे चार कोटीचे कर्ज वाटप करुन सहकारी बँकेच्या चार पदाधिकार्‍यांनी बँकेत आर्थिक घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार विलेपार्ले परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी बँकेच्या चार पदाधिकार्‍याविरुद्ध विलेपार्ले पोलिसांनी कट रचून पैशांचा अपहार करुन बँकेची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रमेश विठ्ठल शिरगांवकर, दशरथ पुंडलिक नाईक, वैशाली कृष्णा मयेकर आणि गोपाळ मुकूंद परब अशी या चौघांची नावे असून ते चौघेही मराठा सहकारी बँकेचे माजी वरिष्ठ पदाधिकारी आहेत. जानेवारी २००३ ते डिसेंबर २००६ या कालावधीत हा संपूर्ण घोटाळा झाला असून वीस वर्षांनंतर बँकेच्या वतीने पोलिसांत तक्रार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

६४ वर्षांचे तक्रारदार बोरिवलीतील गोराई परिसरात राहत असून एका बँकेत विशेष अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पूर्वी ते मराठा सहकारी बँकेत क्लार्क म्हणून काम पाहत होते. २०२१ साली ते बँकेतून निवृत्त झाले. या बँकेची विलेपार्ले येथील कुंकूवाडी, गंगापुरी अपार्टमेंटमध्ये एक शाखा आहे. नंतर ही शाखा अंधेरी येथे हलविण्यात आली होती. २०१६ साली सहाय्यक शाखा व्यवस्थापक म्हणून काम करताना त्यांनी बँकेमार्फत कर्जदार आणि जामिनदारांना कर्जाच्या वसुलीसाठी नोटीस बजाविली होती. यातील काही कर्जदारांनी चुकीचे पत्ते दिल्याचे तसेच काही कर्जदारांनी त्यांनी बँकेतून कर्ज घेतले नसल्याचे सांगितले होते.

हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांची चौकशी सुरु केली होती. त्यात २००३ ते २००६ या कालावधीत बँकेच्या विलेपार्ले येथील शाखेने पॅरामेडीकल कंपनीच्या १२६ तर पीपल पॅरामेडिकल कंपनीच्या ८४ अशा २१० कर्मचार्‍यांना कर्जाचे वाटप केले होते. १२६ कर्मचार्‍यांना २ कोटी ४७ लाख ५ हजार तर ८४ कर्मचार्‍यांना १ कोटी ६८ लाख असे ४ कोटी १५ लाख ५ हजार रुपयांचे कर्जाचे वाटप करण्यात आले होते. मात्र २१० कर्मचार्‍यांनी कंपनीत नोकरी केली नव्हती. कर्जाच्या अर्जासोबत सादर करणत आलेले कर्मचार्‍याचे नाव, पत्ता, पगाराचा दाखला, कंपनीचे रबर स्टॅम्प, कर्जाच्या हप्त्याबाबतचा सर्व तपशील बोगस होता. सर्व कर्जदार आणि जामिनदार एकमेकांना जामिन म्हणून घेतले होते. विशेष म्हणजे १२६ कर्जदारांना एकाच कारणासाठी म्हणजे घराच्या दुरुस्तीसाठी कर्ज देण्यात आले होते. त्यासाठी त्यांनी कॉन्ट्रक्टरचे दिलेले दस्तावेजही बोगस होते.

या सर्वांचे बँकेत खाते उघडण्यात आले होते. त्यासाठी ओळख म्हणून अतुल शिरोडकर याची स्वाक्षरी होती. संबंधित बँक खात्यात कर्जाची रक्कम जमा झाल्यानंतर पंधरा ते वीस हजार रुपये उचल दाखवून नंतर पाच टक्के रक्कम मुदत ठेवीमध्ये वळती करण्यात आले होते. यावेळी शाखा व्यवस्थापक म्हणून गोपाळ परब कार्यरत होते. विशेष म्हणजे त्यांनी कर्जाचे पे ऑर्डर कर्जदारांना न देता एजंट अतुल शिरोडकर याला दिले होते. कर्ज देताना अर्जदार आणि जामिनादारांना बँकेचा खातेदार असणे बंधनकारक होते, मात्र त्यापैकी कोणालाही सभासद करण्यात आले नाही. कर्जाचे वाटप केल्यानंतर २१० कर्मचार्‍यांनी कर्जाचे हप्ते भरले नाही.

गोपाळ परब आणि त्यावेळेचे संचालकांनी नऊ ते दहा वर्ष कर्ज थकीत असताना कोणावर कारवाई केली नव्हती. या संपूर्ण घोटाळ्यात बँकेचे माजी सीईओ दशरथ नाईक, प्रमुख व्यवस्थापक दशरथ नाईक, कर्ज व्यवस्थापक वैशाली मयेकर आणि शाखा व्यवस्थापक गोपाळ परब यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या नियमांचे सर्रासपणे उल्लघंन करुन कंपनीचे कर्मचारी नसताना दोन्ही कंपनीचे कर्मचारी असल्याचे दाखवून २१० कर्मचार्‍यांना ४ कोटी १५ लाख ५ हजार रुपयांच्या कर्जाचे वाटप करुन या रक्कमेचा परस्पर अपहार करुन बँकेची फसवणुक केली होती.

ही कर्ज वसुली न झाल्याने रिझर्व्ह बँकेने मराठा सहकारी बँकेचे कॉसमॉस सहकारी बँकेत विलीनकरण केले होते. त्यानंतर तक्रारदारांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना ही बाब सांगून त्यांचा एक अहवाल सादर केला होता. या अहवालानंतर बँकेच्या वतीने तक्रारदारांनी विलेपार्ले पोलीस ठाण्यात माजी सीईओ रमेश शिरगावकर, माजी प्रमुख व्यवस्थापक दशरथ नाईक, माजी कर्ज व्यवस्थापक वैशाली मयेकर आणि शाखा व्यवस्थापक गोपाळ परब यांच्याविरुद्ध कट रचून बँकेच्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु असून या चारही आरोपींची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page