भारतीय आर्मीच्या कर्नलच्या घरी झालेल्या चोरीचा पर्दाफाश
आरोपी मोलकरणीला चोरीच्या संपूर्ण मुद्देमालासह अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ ऑगस्ट २०२६
मुंबई, – दक्षिण मुंबईतील कफ परेड येथील मिलिटरी स्टेशनमध्ये राहणार्या आर्मीच्या एका कर्नलच्या झालेल्या चोरीचा पर्दाफाश करण्यात कफ परेड पोलिसांना यश आले आहे. याप्रकणी सपना संजय सिंग नावाच्या आरोपी मोलकरणीला पोलिसांनी अटक केली असून तिच्याकडून चोरीचा १६ लाख ६४ हजार रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सपना ही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तिच्या अटकेने अशाच तीन ते चार चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरीसाठी तिने कर्नलच्या घरासह कपाटातील डुप्लीकेट चावी बनविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर तिला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
सविता राजीव द्विवेदी ही महिला कुलाबा येथील मिलिटरी स्टेशन, नेपीयर रोडच्या जेम्स हाऊसमध्ये तिचे पती राजीव, दोन मुले भविष्य आणि देवेश यांच्यासोबत राहते. तिचे पती राजीव हे भारतीय सेनेत कर्नल म्हणून कार्यरत आहेत. तिच्या घरी घरकामासाठी सपना आणि रसिका राजेश कदम या दोघीही कामाला होत्या. १९ जूनला तिला लखनऊला जायचे होते. त्यामुळे तिने कपाटातील तिचे सोन्याचे दागिने काढण्याचा प्रयत्न केला, मात्र कपाटात तिला तिचे विविध सोन्याचे दागिने, चांदीच्या नाणी, चांदीचा कमरेचा दोरी, भारतीय आणि विदेशी चलन असा साडेसोळा लाखांचा मुद्देमाल दिसून आला नाही.
तिने कपाटात सर्व दागिने आणि कॅशचा शोध घेतला, मात्र तिला दागिने आणि कॅश सापडले नाही. तिच्या घरी सपना आणि रसिका वगळता इतर कोणीही येत नव्हते. त्यामुळे या दोघींपैकी एकीने ही चोरी केल्याचा तिला संशय होता. त्यामुळे तिने तिच्या घरी गुप्त कॅमेरा बसविला होता. ३ जुलैला ती सीसीटिव्ही फुटेज पाहत होती. यावेळी तिला सपना तिच्या बेडरुममधील कपाटातील कुलूप चावीच्या सहाय्याने उघडून त्यातील पर्समधील कॅश आणि इतर वस्तू काढताना दिसून आली. या घटनेनंतर सविता आणि राजीव द्विवेदी यांनी सपनाकडे विचारणा केली असता तिने ती मी नव्हेच असा आव आणण्याचा प्रयत्न केला.
सीसीटिव्ही फुटेज दाखविल्यानंतर तिने १९ जून ते ३ जुलै २०२६ या कालावधीत कपाटातील विविध सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू, विदेशी, भारतीय चलन असा साडेसोळा लाखांचा मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली. या घटनेनंतर सविता द्विवेदीने सपनाविरुद्ध चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी तिच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ती पळून गेली होती. त्यामुळे तिच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गायकवाड, पोलीस निरीक्षक अनंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर, पोलीस हवालदार संतोष पाटील, शेखर फड, सचिन खामकर, पोलीस शिपाई विलास जाधव, कुमार पाथरुट आदी पथकाने वॉण्टेड असलेल्या सपना सिंगला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत तिनेच ही चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर तिच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
तपासात सपनाने सविता द्विवेदी यांच्या घरासह कपाटातील डुप्लीकेट चावी बनविली होती. या चावीच्या मदतीने तिने घरात चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तिच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आल्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर यांनी सांगितले. तिने अशाच प्रकारे तीन ते चार ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली असून या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.