कौटुंबिक वादातून २९ वर्षांच्या महिलेची चाकूने भोसकून हत्या

हत्येनंतर आरोपी पतीचे हॉस्पिटलमधून पलायन

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० ऑगस्ट २०२६
मुंबई, – कौटुंबिक वादातून सुचिता आकाश साळुंखे या २९ वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. सुचिताला मृत घोषित करताच आरोपी पती आकाश साळुंखे हा कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमधून पळून गेला आहे. त्याच्याविरुद्ध कुरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून त्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

ही घटना रविवारी मध्यरात्री पावणेदोन ते सव्वादोनच्या सुमारास मालाड येथील कुरार व्हिलेज, तानाजीनगर, शिवसागर सोसायटीमध्ये घडली. याच सोसायटीमध्ये सुचिता ही तिचा पती आकाश आणि चार वर्षांच्या मुलासोबत राहत होती. पाच वर्षांपूर्वी या सुचिता अणि आकाश यांचा प्रेमविवाह झाला होता. सुचिता ही एका पॅथोलॉजी लॅबोरेटरीमध्ये कामाला होती तर आकाश हा काहीच कामधंदा करत नव्हता. त्याला दारु आणि ड्रग्ज सेवन करण्याचे व्यसन होते. त्यासाठी तो सुचिताकडे सतत पैशांची मागणी करत होता. तिने पैसे दिले नाहीतर तिचा मानसिक शोषण करत होता.

गेल्या काही दिवसांपासून याच कारणावरुन त्यांच्यात सतत खटके उडत होते. रविवारी रात्री उशिरा सुचिता आणि आकाश यांच्यात क्षुल्लक कौटुंबिक कारणावरुन प्रचंड वाद झाला होता. या वादानंतर रागाच्या भरात त्याने घरातून चाकूने तिच्या छातीवर भोसकले होते. त्यात ती गंभीरररीत्या जखमी झाला होता. या घटनेनंतर तो प्रचंड घाबरला आणि त्याने स्थानिक रहिवाशांच्या मदतीने रक्तबंबाळ झालेल्या सुचिताला तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे सुचिताला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.

ही माहिती मिळताच आकाश हा मुलाला हॉस्पिटलमधून टाकून पळून गेला होता. हॉस्पिटलमधून ही माहिती प्राप्त होताच कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. प्राथमिक तपासात सुचिताची हत्या आकाशनेच केल्याचे उघडकीस आले आहे. हत्येनंतर तो पळून गेल्याने त्याच्याविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. त्याचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी शोध घेत आहे. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page