घातक शस्त्रांसह उत्तरप्रदेशातील रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक
दोन पिस्तूलसह दहा जिवंत काडतुसांचा साठा जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० ऑगस्ट २०२६
मुंबई, – घातक शस्त्रांसह उत्तरप्रदेशातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला घाटकोपर युनिटच्या अधिकार्यांनी अटक केली. मनिष मंटू सहानी असे या ३३ वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी स्वयचलित दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि दहा जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मनिषविरुद्ध दोन हत्येसह रॉबरीच्या गुन्ह्यांची नोंद असून या तिन्ही गुन्ह्यांत त्यांनी जप्त केलेल्या पिस्तूलचा वापर झाल्याचे बोलले जाते.
गेल्या काही वर्षांत इतर राज्यातून मुंबई शहरात घातक शस्त्रे विक्री करणार्या काही टोळ्या सक्रिय झाल्या होत्या. त्यामुळे अशा आरोपीविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना घाटकोपर परिसरात काहीजण घातक शस्त्रांसह येणार असल्याची माहिती युनिट सातच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनाजी साठे, महेश शेलार, पोलीस हवालदार विलास राऊत, पोलीस शिपाई जितेंद्र पाटील, मुकेश गोरडे, प्रसन्नजीत सावदेकर, महिला पोलीस शिपाई सविता शिंदे, शुभांगी कहालकर आदी पथकाने घाटकोपरच्या असल्फा, अशोका वन हॉटेलजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती.
रविवारी तिथे मनिष सहानी आला होता, त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना दोन पिस्तूल आणि दहा जिवंत काडतुसे सापडले. चौकशीत मनिष हा मूळचा उत्तरप्रदेशच्या गोरखपूर, गीता वतिकाचा रहिवाशी असून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध २०१९ साली गोरखपूरच्या शहापूर तर २०२१ खोराबाद पोलीस ठाण्यात दोन हत्येच्या तर २०१४ साली समदे उलवा पोलीस ठाण्यात रॉबरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. या तिन्ही गुन्ह्यांत त्याने जप्त केलेल्या घातक शस्त्रांचा वापर केल्याचे बोलले जाते.
त्याच्याविरुद्ध घातक शस्त्रे बाळगणे, शस्त्रांची विक्री करण्याचा प्रयत्न करणे आदी कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. मनिषची वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट सातचे पोलीस अधिकारी चौकशी करत आहेत.