पाच कोटीच्या कर्जासाठी ४७ लाखांचा अपहार करुन फसवणुक

बॅकेच्या तोतया कर्मचार्‍यासह दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० ऑगस्ट २०२६
मुंबई, – पाच कोटीचे कर्ज मंजूर झाल्याचे सिंगापूरच्या आरएचबी बँकेचे पत्र सादर करुन कर्जासाठी घेतलेल्या सुमारे ४७ लाखांच्या कमिशनचा अपहार करुन फसवणुक केल्याचा प्रकार दहिसर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सुरेंद्र जैस्वाल आणि अन्वर सौंदेकर या दोन ठगाविरुद्ध दहिसर पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यातील अन्वरने स्वतला बँक कर्मचारी असल्याचे सांगून ही फसवणुक केली तर याकामी त्याला सुरेंद्र जैस्वालने मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मोहम्मद अर्शफ अस्लम शेख हे बेकरी व्यावसायिक असून त्यांच्या वयोवृद्ध वडिल, पत्नी आणि मुलांसोबत दहिसर परिसरात राहतात. १९९५ साली त्यांच्या वडिलांनी दहिसर येथील रावळपाडा परिसरात सेव्हन स्टार नावाने एक बेकरीचा व्यवसाय सुरु केला होता. गेल्या पंधरा वर्षांपासून ते त्यांच्या वडिलांना व्यवसायात मदत करत आहेत. बेकरीची जागा त्यांनी कबीरुद्दीन लालानी यांच्याकडून भाडेतत्वर घेतली होती. त्यांच्या निधनानंतर बेकरीच्या जागेचे मालक हक्क त्यांचा मुलगा करीम लालानीकडे आले होते. या जागेची करीमला विक्री करायची होती. त्यामुळे त्याने ती जागा पाच कोटींना विक्री करण्याचे ठरविले होते.

यावेळी मोहम्मद अर्शफ यांनी ती जागा खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी बँकेतून कर्ज काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना बँकेकडून पाच कोटीचे कर्ज मिळत नव्हते. याच दरम्यान त्यांचा जवळचा मित्र सुरेंद्र जैस्वालने त्यांना त्याचा मित्र अन्वर सौंदेकर हा त्याला कर्ज मिळवून देईल असे सांगितले होते. अन्वरची मलेशियाच्या आरएचपी बँकेत ओळख आहे. ही बँक मुस्लिम लोकांना कर्ज देत असल्याने त्यांना नक्कीच बँकेतून कर्ज मिळेल असे सांगितले होते. काही दिवसांनी त्यांना भेटण्यासाठी अन्वर आला होता. त्याने त्यांना आरएचबी, सिंगापूर बँकेचे एक ओळखपत्र दाखविले. त्याने त्यांना बिन व्याजी कर्ज मंजूर करुन देतो असे सांगून त्यांच्याकडे कमिशन म्हणून ४५ लाखांची मागणी केली होती.

मोहम्मद अर्शफ यांनी कमिशन देण्याची तयारी दर्शविल्यानंतर त्याने त्यांच्याकडून कर्जासाठी सर्व दस्तावेज घेतले होते. याच दरम्यान त्यांनी त्याला कॅश आणि धनादेशाद्वारे ४७ लाख ५० हजार रुपये दिले होते. या पेमेंटनंतर काही महिन्यांत त्याने त्यांना कर्ज मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना कर्ज मिळवून दिले नाही. विचारणा केल्यानंतर तो वेगवेगळे कारण सांगत होता. २०२२ ते २०२४ या कालावधीत त्यांनी अन्वर कॅश स्वरुपात ३५ लाख ५० हजार तर १२ लाख धनादेशद्वारे दिले होते, तरीही दोन वर्षांत त्याने त्यांना कर्जाची रक्कम दिली नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी सुरु केली, पैसे दिले नाहीतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली होती.

यावेळी या दोघांनी आणखीन काही दिवसांची मुदत मागून घेतली. या कालावधीत त्यांनी कर्जाची रक्कम दिली नाहीतर कर्जासाठी घेतलेली रक्कम ५६ लाखांच्या व्याजासहीत परत करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांना कर्ज मिळवून दिले नाही. याच दरमयन अन्वर सौंदेकर हा त्याच्या कार्यालय बंद करुन पळून गेला होता. त्याने कर्ज मंजुरीचे दिलेले बँकेचे पत्रही बोगस होते. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी दहिसर पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सुरेंद्र जैस्वाल आणि अन्वर सौंदेकर यांच्याविरुद्ध पोलिसांनी बोगस कर्जाचे पत्र दाखवून कर्जासाठी घेतलेल्या ४७ लाख ५० हजार रुपयांच्या कमिशनचे अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु असून पळून गेलेल्या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page