पूर्ववैमस्नातून ४८ वर्षांच्या व्यक्तीची लोखंडी पाईपने मारहाण करुन हत्या

हत्येचा गुन्हा दाखल होताच आरोपीस अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० ऑगस्ट २०२६
मुंबई, – पूर्ववैमस्नातून झालेल्या वादातून मोहम्मद शेहजाद मोहम्मद अलीम शेख या ४८ वर्षांच्या व्यक्तीची त्याच्याच परिचित आरोपीने लोखंडी पाईपने डोक्यात बेदम मारहाण करुन हत्या केल्याची घटना आग्रीपाडा परिसरात घडली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच हल्ल्यानंतर पळून गेलेल्या ३८ वर्षांचा आरोपी सय्यद शोहबतअली अन्सारी याला आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली. हत्येच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

ही घटना शनिवारी सायंकाळी सव्वापाच वाजता आग्रीपाडा येथील मौलाना आझाद रोड, हमीद इमारतीच्या न्यू लाईफ रेस्ट्रारंटमध्ये घडली. या परिसरातील रमजान इमारतीमध्ये हनीफ आदमभाई जुनकिया हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. ते हॉटेल व्यावसायिक असून त्यांच्या मालकीचे न्यू लाईफ नावाचे एक रेस्ट्रॉरंट आहे. मोहम्मद शेहजाद आणि सय्यद हे दोघेही एकमेकांच्या परिचित असून त्यांच्यात एक जुना वाद होता. शनिवारी सायंकाळी सव्वापाच वाजता या दोघांचा न्यू लाईफ रेस्ट्रारंटमध्ये पुन्हा वाद झाला होता.

या वादानंतर त्याने मोहम्मद शेहजाद याच्यावर लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे जखमी झालेल्या मोहम्मद शेहजादला स्थानिक रहिवाशांनी तातडीने मुंबई सेंट्रल येथील नायर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. हत्येची माहिती प्राप्त होताच आग्रीपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी हनीफ जुनकिया यांच्याकडून पोलिसांना घडलेला प्रकार समजला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी सय्यद अन्सारीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

हल्ल्यानंतर सय्यद हा पळून गेला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना त्याला आग्रीपाडा येथून पोलिसांनी शिताफीने अटक केली. सय्यद हा आग्रीपाडा येथील मौलाना आझाद रोड, काळापाणी पोलीस चौकीजवळील फुटपाथजवळ राहतो. तो सध्या काहीच कामधंदा करत नाही. चौकशीत पूर्ववैमस्नातून त्याने मोहम्मद शेहजादची लोखंडी पाईपने डोक्यात बेदम मारहाण करुन हत्या केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page