पोलीस खबरी असल्याच्या संशयावरुन तरुणावर हल्ला

एकाच कुटुुंबियांतील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ जुलै २०२४
मुंबई, –  पोलीस खबरी असल्याच्या संशयावरुन एका २५ वर्षांच्या तरुणावर तिघांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात राहुल राजू शिंदे हा तरुण जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अक्रम दस्तगीर बाबासाहब शेख, अल्ताफ दस्तगीर बाबासाहब शेख आणि सोहेल दस्तगीर बाबासाहब शेख अशी या तिघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

राहुल हा जोगेश्‍वरीतील अग्रवाल इस्टेट, शास्त्रीनगरच्या अब्दुल बडोची चाळीत त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. तो एका खाजगी कंपनीत ऑफिस बॉय तर त्याचे वडिल चालक म्हणून काम करतात. त्यांच्याच बाजूच्या एसआरए इमारतीमध्ये शेख कुटुंबिय राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. त्यांना नशा करण्याचे व्यसन होते. १ जुलैला रात्री दहा वाजता अक्रम आणि अल्ताफ हे दोघेही तिथे नशा करत होते. यावेळी तिथे पोलीस आले. पोलिसांना ही माहिती राहुल यानेच दिल्याचा त्यांना संशय होता. त्यामुळे त्यांना त्याच्यावर राग होता. दुसर्‍या दिवशी त्यांनी राहुलला ओमसाई सहकारी सोसायटीच्या गार्डनसमोर बोलाविले होते. तिथे गेल्यानंतर अक्रम, अल्ताफ आणि सोहेल यांनी त्याला शिवीगाळ करुन बेदम लाथ्याबुक्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीत तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ही माहिती मिळताच ओशिवरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी राहुलची पोलिसांनी जबानी नोंदवून घेऊन घेतली असून त्याच्या तक्रारीवरुन तिन्ही आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page