तीन वर्षांच्या मुलीशी जवळीक साधून लैगिंक अत्याचार
पंधरा वर्षांच्या मुलाची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१४ ऑगस्ट २०२४
मुंबई, – तीन वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून तिच्यावर पंधरा वर्षांच्या मुलाने लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी साकिनाका परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत आरोपी पंधरा वर्षांच्या मुलाला साकिनाका पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला पुढील कारवाईसाठी डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
२५ वर्षांची तक्रारदार महिला ही साकिनाका परिसरात राहत असून तिला चार वर्षांची मुलगी आहे. तिच्याच शेजारी पंधरा वर्षांचा आरोपी राहत असून तो तिच्या घरी नियमित येत होता. मंगळवारी दुपारी ही महिला कामानिमित्त बाहेर गेली होती. यावेळी तिची मुलगी घरात एकटीच होती. दुपारी सव्वाबारा वाजता तिच्या घरी आरोपी आला. घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्याने पिडीत मुलीशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर त्याने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. दुपारी दिड वाजता तक्रारदार महिला घरी आली असता तिला मुलीकडून हा प्रकार समजला. त्यानंतर तिने साकिनाका पोलिसांना घडलेला प्रकार सांगून पंधरा वर्षांच्या आरोपी मुलाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत साकिनाका पोलिसांना गुन्हा दाखल करुन तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर आरोपी मुलाविरुद्ध पोलिसांनी ६३ (बी), ६५ (२) भारतीय न्याय सहिता सहकलम ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला त्याच्या राहत्या घरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तो अल्पवयीन असल्याने त्याला सायंकाळी डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले. मंगळवारी दुपारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.