बिहारहून आणलेल्या चरससह ३१ वर्षांच्या रिक्षाचालकाला अटक

रिक्षाचालकाकडून दहा कोटीचा दहा किलो चरसचा साठा जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ ऑगस्ट २०२६
मुंबई, – बिहारहून मुंबईत विक्रीसाठी आणलेल्या चरससह ३१ वर्षांच्या रिक्षाचालकाला वरळी युनिटच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्‍यांनी अटक केली. आरोपी मूळचा बिहारचा रहिवाशी असून त्याच्याकडून दहा किलो दहा ग्रॅम वजनाचा चरसचा साठा पोलिसांनी जप्त केला असून त्याची किंमत दहा कोटी दहा लाख रुपये इतकी आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने शुक्रवार २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

गेल्या काही महिन्यांत इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मुंबईत आणून त्याची विक्री होत असल्याचे अनेक प्रकरणातून उघडकीस आले आहे. त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना बिहारला काहीजण कोट्यवधी रुपयांचा चरसचा साठा घेऊन मुंबई शहरात येणार असल्याची माहिती वरळी युनिटच्या अधिकार्‍यांना मिळाली होती.

या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोली आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंके, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण वाघ व अन्य पोलीस पथकाने वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती.

सोमवारी तिथे आलेल्या एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडील सामानाची झडती घेतल्यानंतर त्यात पोलिसांना दहा किलो दहा ग्रॅम वजनाचे चरस सापडले. या चरसची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे दहा कोटी रुपये आहे. चौकशीत आरोपी मूळचा बिहारचा रहिवाशी असून तिथेच त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. तो रिक्षाचालक म्हणून काम करतो. बिहारहून त्याने चरसचा साठा मुंबई शहरात विक्रीसाठी आणला होता. मात्र चरसची विक्री करण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदवून नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला शुक्रवार २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याला ते चरस कोणी दिले, तो मुंबईत चरसचा साठा कोणाला देणार होता. त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page