नऊ महिन्यांच्या अल्पवयीन मुलाच्या अपहरणाचा पर्दाफाश

22 वर्षांच्या आरोपीस अटक करुन मुलाची सुखरुप सुटका

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 नोव्हेंबर 2025
कल्याण, – कल्याण रेल्वे स्थानकाजवळील ब्रिजवरुन एका नऊ महिन्यांच्या अल्पवयीन मुलाच्या अपहरणाचा कल्याण रेल्वे पोलिसांनी पर्दाफाश करुन एका 22 वर्षांच्या मुख्य आरोपीस अटक केली. अक्षय शैलेश खैरे असे या आरोपीचे नाव असून त्याच्या तावडीतून अपहरण झालेल्या मुलाची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आरोपी हा ड्रग्जच्या आहारी गेला असून नशेत असताना त्याने या मुलाचे अपहरण केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दुजोरा दिला आहे.

पूनम निलेश कोंगळे ही महिला मूळची जळगावची रहिवाशी आहे. 4 नोव्हेंबर 2025 रोजी ती तिच्या पती आणि तीन मुलांसोबत कल्याण रेल्वे स्थानकाजवळील कोळसेवाडी ब्रिजला जोडून असलेल्या ब्रिजवर झोपली होती. पहाटे पावणेचार ते सकाळी सहाच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने तिच्या नऊ महिन्यांच्या मुलाचे अपहरण केले होते. सकाळी सहा वाजता हा प्रकार निदर्शनास येताच तिच्यासह तिच्या पतीने मुलाचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्यांना त्यांचा कुठेच सापडला नाही. त्यामुळे त्यांनी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगून मुलाची मिसिंग तक्रार केली होती. या तक्रारीची रेल्वे पोलिसांनी गंभीर दखल घेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

या तक्रारीची पोलीस उपायुक्त सुनिता साळुंके-ठाकरे, प्रज्ञा जेडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर शिंदे यांनी गंभीर दखल घेत कल्याण रेल्वे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक बद्दू चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीपत टिळे, किरण कांबळे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद जगताप, पोलीस हवालदार अभिजीत जगताप, पोलीस शिपाई धनंजय शेटे, अक्षय पाटील, अमीर तांबोळी यांनी तपास सुरु केला होता. रेल्वे स्थानक आणि परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर एक अज्ञात व्यक्ती तक्रारदार महिलेच्या मुलाला घेऊन कल्याण रेल्वे स्थानकातून महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जात असल्याचे दिसून आले.

या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन या पथकाने अक्षय खैरे या तरुणाला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच या मुलाचे अपहरण केल्याची कबुली दिली. अक्षय हा कल्याण पूर्वेला राहत असून त्याला नशा करण्याचे व्यसन होते. गुन्ह्यांच्या दिवशी त्याने नशा केली होती. याच नशेत असताना त्याने झोपत असलेल्या नऊ महिन्यांच्या मुलाचे अपहरण केले होते. त्याला घेऊन तो त्याच्या घरी आला होता. त्याच्याकडून अपहरण झालेल्या मुलाची सुखरुप सुटका करण्यात आली. या मुलाला नंतर त्याच्या तक्रारदार आईच्या स्वाधीन करण्यात आले.

अपहरणाचा गुन्हा नोंद होताच कुठलाही पुरावा नसताना अवघ्या चार ते पाच तासांत कल्याण रेल्वे पोलिसांनी नऊ महिनंच्या मुलाच्या अपहरणाचा पर्दाफाश करुन मुख्य आरोपीस अटक केली. त्याच्या तावडीतून मुलाची सुटका करुन त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. या कारवाईबाबत पोलीस उपायुक्त सुनिता साळुंके-ठाकरे, प्रज्ञा जेडगे यांनी संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे कौतुक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page