चांगला परताव्याच्या आमिषाने गंडा घालणार्या आरोपीस अटक
शेअर ट्रेडिंगची माहिती देताना गुंतवणुकीच्या बहाण्याने घातला गंडा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 एप्रिल 2026
मुंबई, – शेअर गुंतवणुकीवर चांगला परताव्याच्या आमिषाने एका खाजगी कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्याची सुमारे 74 लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी राजबहादूर मोहनलाल वर्मा नावाच्या एका आरोपीस उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. शेअर ट्रेडिंगची माहिती देताना गुंतवणुकीचा सल्ला देऊन या टोळीने तक्रारदारांची फसवणुक झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर राजबहादूर वर्माला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. फसवणुकीसाठी त्याने सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचा आरोप आहे.
राकेश रमेश सोमय्या हे 52 वर्षांचे तक्रारदार कांदिवलीतील ठाकूर व्हिलेजमध्ये राहतात. सध्या ते एका खाजगी कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कामाला आहेत. त्यांना शेअरमध्ये गुंतवणुक करायची होती, त्यामुळे ते शेअर ट्रेडिंग शिकण्यासाठी ऑनलाईन सर्च करुन माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. डिसेंबर 2025 रोजी त्यांना शिबानी नावाच्या एका महिलेचा कॉल आला होता. तिने ती अल्फा अलायन्स ग्रुपमध्ये सहाय्यक मॅनेजर असल्याचे सांगून ही कंपनी शेअर ट्रेडिंगमध्ये लोकांना मार्गदर्शनासह त्यांना जास्तीत कसा फायदा होईल याबाबत सल्ला देत असल्याचे सांगितले. याबाबत त्यांनी तिला होकार दर्शविताच तिने त्यांना कंपनीच्या व्हॉटअप ग्रुपमध्ये अॅड केले होते.
या ग्रुपमध्ये शेअर ट्रेडिंगसह कुठल्या शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास त्यांना चांगला फायदा होईल, कशाप्रकारे कॅश डिपॉझिट करायची याबाबत माहिती सांगितली जात होती. त्यामुळे त्यांन कंपनीच्या माध्यमातून शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास सुरुवात केली होती. काही दिवसांत त्यांनी विविध शेअरमध्ये सुमारे 74 लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना 1 कोटी 67 लाख रुपये इतका प्रॉफिट झाला हेता. ही रक्कम त्यांनी विड्रॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना आणखीन 88 लाख रुपये शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देण्यात आला होता. त्यांनी इतकी रक्कम त्यांच्याकडे नसून तुम्ही मला मदत करा अशी विनंती केली. यावेळी ग्रॅुप अॅडमिनसह शिबानीने ही रक्कम त्यांना भरावीच लागेल. नाहीतर त्यांची मूळ रक्कम आणि त्यावरील प्रॉफिट रक्कम मिळणार नाही असे सांगितले.
88 लाख रुपये जमा केल्यास त्यांना 260 ते 300 टक्के प्रॉफिट देण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यांनी पैसे भरण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी त्यांना प्रतिसाद देणे बंद केले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच राकेश सोमय्या यांनी उत्तर सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. तपासात ही रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. त्यापैकी एक बँक खाते राजबहादूर वर्मा याचे होते. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
तपासात तो काही सायबर ठगांच्या संपर्कात होते. त्यांच्याच सांगण्यावरुन त्यांनी बँकेत खाते उघडले होते. या बँक खात्याची माहिती सायबर ठगांना दिल्यानंतर फसवणुकीची ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाली होती. फसवणुकीसाठी बँक खाती दिल्याने त्यांना फसवणुकीच्या रक्कमेची काही रक्कम कमिशन म्हणून देण्यात आली होती. तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याला नंतर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.