गुंतवणुकीसह खंडणीसाठी धमकी देऊन सव्वातीन कोटींची फसवणुक

वॉण्टेड असलेल्या अन्य एका आरोपीस अटक तर इतरांचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 मे 2026
मुंबई, – अंधेरीतील एका व्यावसायिकाला चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन नंतर खंडणीसाठी धमकाविल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या अन्य एका आरोपीस विमानतळ पोलिसांनी अटक केली. चेतन संघवी असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत यापूर्वी उमेशकुमार सरोवर ऊर्फ उमेशकुमार सुमन ऊर्फ सुबोध रंजन आणि रुपेशकुमार श्रीवास्तव या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. आता चेतनला अटक झाल्याने या गुन्ह्यांतील अटक आरोपींची संख्या तीन झाली आहे. इतर काही आरोपी फरार असल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे. या टोळीने फसवणुकीसह खंडणी म्हणून व्यावसायिकाकडून सव्वातीन कोटीची वसुली केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

41 वर्षांचे तक्रारदार आयुष योगराज नाकरा हे अंधेरीतील अंधेरी-कुर्ला रोड, एनडीडब्ल्यू प्राक्सिमा अपार्टमेंटमध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांचा स्वतचा व्यवसाय असून त्यांची एक खाजगी कंपनी आहे. जुलै 2025 त्यांची लक्ष्मीनारायण, देवकुमार, सुशील आणि चेतन यांच्याशी ओळख झाली होती. ते चौघेही ब्रोकर म्हणून काम करत होते. त्यांनी इतर आरोपींच्या मदतीने कट रचून त्यांना आर्कशिप ग्रुपमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर चांगला परताव्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यांच्या आमिषाला बळी पडून त्यांनी संबंधित कंपनीत एक कोटीची गुंतवणुक केली होती.

22 ऑगस्ट 2025 रोजी ही रक्कम त्यांनी कंपनीच्या बँक खात्यात ऑनलाईन ट्रान्स्फर केली होती. मात्र ती रक्कम मानव धर्मयोग या एनजीओच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. हा प्रकार उघडकीस येताच ते संबंधित आरोपींना विचारणा केली होती. त्यांना भेटण्यासाठी ते त्यांच्या कंपनीचा महाव्यवस्थापक पंकज रावत यांच्यासोबत विलेपार्ले येथील वेस्टर्न एक्सप्रेय हायवे, हॉटैल सहारा स्टारमध्ये गेले होते. तिथेच त्यांना उमेशकुमार व त्याच्या पंधरा सहकार्‍यांनी जिवे मारण्याची धमकी देत बेदम लाथ्याबुक्यांनी मारहाण केली होती. यावेळी या टोळीने पंकज रावत यांना बेदम मारहाण केली होती. पिस्तूल रोखूून तसेच धमकावून त्यांच्याकडे तीन कोटीची खंडणीची मागणी केली होती.

ही रक्कम दिली नाहीतर त्यांना जिवंत सोडणार नाही, त्यांचा मृतदेहच घरी पाठवू अशी धमकी दिली होती. जिवाच्या भीतीने त्यांनी त्यांना ऑनलाईन सव्वादोन कोटी रुपये ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम ट्रान्स्फर केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. हा प्रकार पोलिसांना सांगितला तर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली होती. दुसर्‍या दिवशी त्यांना सव्वादोन कोटीची रक्कम नई जीवन ज्योती फाऊंडेशन या एनजीओमध्ये ट्रान्स्फर झाल्याचे समजले. घडलेल्या प्रकाराने आयुष नाकरा हे प्रचंड मानसिक तणावात होता.

जिवाच्या भीतीने त्यांनी हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र कुटुंबियांसह मित्रांनी त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी एअरपोर्ट पोलिसांना घडलेला प्रकार सांगून नऊ आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लक्ष्मीनारायण अग्रवाल, देवकुमार राय, सुशीलकुमार यादव, चेतन संघवी रामशिषकुमार गुप्ता ऊर्फ कुमार सर, उमेशकुमार सुमन ऊर्फ सुबोध रंजन, साक्षीकुमारी ऊर्फ वर्षा, स्वाती आणि गोयल या नऊजणांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक, खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी देणे, गंभीर दुखापत करणे तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

तपासात सर्व आरोपी मुंबईसह ओरिसा, बिहार आणि झारखंडचे रहिवाशी होते, त्यामुळे त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना उमेशकुमार आणि रुपेशकुमार या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून चेतनचा सहभाग उघडकीस येताच त्याला शनिवारी पोलिसांनी अटक केली. सध्या तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page