चांगला परवाता देण्याच्या आमिषाने गुंतवणुकीस प्रवृत्त करुन फसवणुक

९४ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी आरोपी पती-पत्नीला अटक

0

राजू परुळेकर
३ जुलै २०२६
मुंबई, – चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून व्यवसायात गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन एका व्यावसायिकाची सुमारे ९४ लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी आरोपी पती-पत्नीला समतानगर पोलिसांनी अटक केली. समीर रविंद्र भोसले आणि शुभ्रा समीर भोसले अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाहीब बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध दहिसर पोलीस ठाण्यात अशाच एका गुन्ह्यांची नोंद असून हा त्यांच्याविरुद्ध दाखल झालेला दुसरा गुन्हा आहे. याच गुन्ह्यांत कुणाल इंदुलकर याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

विनित बाळकृष्ण सुर्वे हे बेकरी व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत बोरिवली परिसरात राहतात. कांदिवलीतील ठाकूर व्हिलेजमध्ये त्यांची स्वतची एक बेकरी आहे. अक्षय तंत्री हे त्यांच्या परिचित पुजारी असून गेल्या अकरा वर्षांपासून ते त्यांच्या घरी पूजा करण्यासाठी येतात तसेच ते स्वत त्यांच्या महालक्ष्मी येथील कार्यालयात त्यांना भेटण्यासाठी जात होते. २०१८ साली त्यांच्या कार्यालयात असताना त्यांची कुणाल इंदुलकरसोबत ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. त्याने त्याचा सहकारी समीर भोसले असून त्याने आयटी फिल्ड सोडली आहे. त्याला स्वतचा आयटीमध्ये व्यवसाय सुरु करायचा आहे. त्यासाठी त्यांनी त्याच्या व्यवसायात गुंतवणुक करावी अशी विनंती केली होती.

नोव्हेंबर २०२१ रोजी कुणाल हा समीर व त्याची पत्नी शुभ्रा यांच्यासोबत त्यांच्या बेकरीमध्ये आले होते. यावेळी त्यांनी फोर एस टेक्नोलॉजी नावाची एक कंपनी सुरु केली असून त्यात ते दोघेही पार्टनर आहेत. ही कंपनी सीसीटिव्ही बसविणे, व्हिडीओ कॉन्फरसिंगचे काम करते. सध्या त्यांच्याकडे छोटी कामे असून त्यांचा बजेट नसल्याने त्यांना मोठी काम मिळत नाही. त्यांना मोठी कॉन्ट्रक्ट मिळाले असून त्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या व्यवसायात गुंतवणुक केल्यास त्यांना गुंतवणुकीवर वीस ते पंचवीस टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. कुणालवर विश्‍वास ठेवून त्यांनी समीर आणि शुभ्रा यांच्या व्यवसायात गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता.

त्यांचा विश्‍वास बसावा म्हणून ते तिघेही त्यांना विविध कंपनीचे मोठे कॉन्ट्रक्ट मिळाल्याचे दाखवून त्यांच्याकडे जास्तीत जास्त गुंतवणुक करण्याची विनंती करत होते. जेणेकरुन त्यांना चांगला फायदा होईल असे भासविण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे टप्याटप्याने सव्वाकोटीची गुंतवणुक केली होती. यावेळी त्यांच्यात चार वेगवेगळे करार झाले होते. या कराराप्रमाणे त्यांनी त्यांना नोव्हेंबर २०२४ पर्यंत ३१ लाख रुपये गुंतवणुक रक्कमेसह आठ लाख रुपये परतावा असे ३९ लाख रुपये दिले होते. मात्र डिसेंबर २०२४ नंतर त्यांनी मासिक परतावा देण्याचे बंद केले होते. सतत विचारणा करुनही ते तिघेही त्यांना पैसे देत नव्हते. त्यामुळे त्यांनी मूळ रक्कमेसह परतावा असे ९४ लाख रुपये देण्याची मागणी केली होती. मात्र त्यांनी ती रक्कम दिली नाही.

याबाबत कुणालकडे विचारणा केल्यानंतर त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. याच दरम्यान त्यांना २०२३ साली संबंधित आरोपीविरुद्ध दहिसर पोलीस ठाण्यात अशाच प्रकारे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समजली होती. या माहितीने त्यांना धक्काच बसला होता. या तिघांनी मार्च ते जुलै महिन्यांत कंपनीत आर्थिक गुंतवणुक करण्यासाठी विविध कंपन्याचे बोगस कागदपत्रे दाखवून त्यांच्याकडून सव्वाकोटी रुपये घेतले, त्यामोबदल्यात त्यांना ३९ लाख रुपये देऊन उर्वरित ९४ लाखांचा अपहार करुन फसवणुक केली होती. या प्रकारानंतर त्यांनी तिन्ही आरोपीविरुद्ध समतानगर पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कुणाल इंदुलकर, समीर भोसले आणि शुभ्रा भोसले यांच्याविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करुन व्यवसायाच्या गुंतवणुकीसाठी घेतलेल्या ९४ लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच दोन महिन्यानंतर या कटातील मुख्य आरोपी समीर भोसले आणि शुभ्रा भोसले या दोघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page