अनधिकृतपणे कब्जा केलेल्या फ्लॅटवर कर्ज काढून फसवणुक

आरोपी पती-पत्नीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ जुलै २०२६
मुंबई, – फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन फ्लॅटची ठरलेली रक्कम न देता फ्लॅटवर अनधिकृत कब्जा करुन तसेच बँकेतून काढलेल्या कर्जाचे हप्ते न भरता एका वयोवृद्धाची सुमारे ९९ लाख रुपयांची त्यांच्याच परिचित एका जोडप्याने फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी पती-पत्नीविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. विजेंद्र गोविंद प्रभू आणि वासंती विजेंद्र प्रभू अशी या दोघांची नावे असून त्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

६७ वर्षांचे तक्रारदार अजय मथुरादास ठक्कर हे अंधेरी येथे त्यांची वयोवृद्ध पत्नी निता (६४) आणि लहान भाऊ अतुल (६५) यांच्यासोबत राहतात. त्यांचा स्वतचा व्यवसाय होता. मात्र वयोवृद्ध झाल्याने त्यांनी त्यांचा व्यवसाय बंद केला होता. पूर्वी ते सर्वजण अंधैरीतील जिजामाता रोड, अस्मिता मोगरा सहकारी सोसायटीमध्ये राहत होते. हा फ्लॅट त्यांची आई देवीकाबेन ठक्कर हिच्यावर नावावर होता. आईच्या निधनानंतर त्यांनी तो फ्लॅट विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. २०२१ रोजी त्यांच्या परिचित विजेंद्र प्रभू आणि त्याची पत्नी वासंती प्रभू यांनी तो फ्लॅट खरेदीसाठी आपण इच्छुक असल्याचे सांगितले होते. यावेळी त्यांच्या घरी फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला होता. त्यात फ्लॅटची किंमत ९९ लाख २५ हजार रुपये ठरली होती.

मार्च २०२१ रोजी त्यांच्यात फ्लॅटच्या खरेदी-विक्रीचे रजिस्ट्रेशन झाले होते. नोंदणी करताना या दोघांनी ९९ लाख २५ हजार रुपयांचा धनादेश त्यांच्या घरी असून नोंदणी झाल्यानंतर त्यांना धनादेश देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यांच्यवर विश्‍वास ठेवून त्यांनी सेल डिडवर धनादेश व तारीखचा उल्लेख करुन रजिस्ट्रेशन केले होते. मात्र ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांना फ्लॅटची रक्कम दिली नाही. धनादेश देतो असे सांगून त्यांनी फ्लॅटवर अनधिकृतपणे कब्जा केला होता. पेमेंटविषयी विचारणा केल्यानंतर ते दोघेही त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. फ्लॅटचे पेमेंट न देता त्यांनी त्यांच्या मालकीच्या फ्लॅटवर कब्जा करुन त्यांची फसवणुक केली होती.

याच दरम्यान त्यांना विजेंद्र प्रभू आणि वासंती प्रभू यांनी त्यांच्या फ्लॅटवर एका बँकेकडून ५० लाखांचे कर्ज घेतल्याचे समजले होते. कर्जाचे नियमित हप्ते भरत नसल्याने त्यांच्या फ्लॅटवर बॅँकेने कारवाई सुरु केली होती. याच दरम्यान त्यांनी त्यांना ४९ लाख ६२ हजार ५०० रुपयांचे दोन धनादेश दिले होते. मात्र ते दोघेही धनादेश बँकेत न वटता परत आले होते. त्यानंतर त्यांनी त्यांना संपर्क साधणे बंद केले होते. फ्लॅटचा व्यवहार करुन या दोघांनी त्यांची ९९ लाख २५ हजाराची तसेच त्यांच्याच फ्लॅटवर कर्ज काढून बँकेची ५० लाखांची फसवणुक केली होती.

हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी त्यांच्या वकिलामार्फत त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. मात्र त्यांनी या नोटीसला काहीच उत्तर दिले नाही. दुसरीकडे फ्लॅटचा ताबा घेण्यासाठी बँकेच्या वतीने किल्ला कोर्टात एक याचिका सादर करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन कोर्टाने बँकेला फ्लॅटचा ताबा घेण्याची परवानगी दिली होती. या प्रकारानंतर अजय ठक्कर यांनी एमआयडीसी पोलिसांत विजेंद्र प्रभू आणि वासंती प्रभू यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोन्ही पती-पत्नीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page