५५ वर्षांच्या महिलेची घरात घुसून हत्या करणार्या भाडेकरुला अटक
हत्येनंतर नऊ लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ जुलै २०२६
मुंबई, – एकांकी जीवन जगणार्या ज्योती प्रकाश पवार या ५५ वर्षांच्या महिलेची तिच्याच घरात घुसून अज्ञात व्यक्तीने गळा आवळून हत्या केल्याची घटना मलबार हिल परिसरात उघडकीस आली होती. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या भाडेकरु आरोपीला काही तासांत मलबार हिल पोलिसांनी अटक केली. मोहम्मद कैफ मोहम्मद रफि शेख असे या आरोपीचे नाव असून त्याने चोरीच्या उद्देशाने ही हत्या केल्याचे पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांनी सांगितले. हत्येनंतर तो सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पळून गेला होता, मात्र त्याला काही तासांत अटक करुन पोलिसांनी या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला. त्याच्याकडून चोरीचा काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत त्याला सोमवारी लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे.
ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता ते शनिवारी दुपारी दोनदरम्यान मलबार हिल येथील नेपीयन्सी रोड, सिमलानगर रहिवाशी संघात घडली. याच रहिवाशी संघाच्या रुम क्रमांक डीएक्स १०४ मध्ये ज्योती पवार ही एकटीच राहत होती. तिच्या पतीचे निधन झाले असून तिची विवाहीत मुलगी एकता जाधव ही दहिसर परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. ज्योती ही घरकाम करुन स्वतचा उदरनिर्वाह चालवत होती. सध्या ती एका फ्लॅटमध्ये कामाला होती. शनिवारी ती कामावर आली नाही, त्यामुळे तिने तिच्या मालकीणीने तिला कॉल केला, मात्र तिने तिच्या कॉलला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिने तिच्या दहिसर येथील राहणार्या मुलीला कॉल करुन तिची आई कामावर आली नसल्याचे सांगितले. त्यामुळे तिने तिच्या आईला कॉल केला, मात्र वारंवार कॉल करुनही तिने तिला प्रतिसाद दिला नाही.
हा प्रकार संशयास्पद वाटताच ती तिच्या आईच्या घरी आली होती. यावेळी रुमला बाहेरुन कुलूप लावले होते, मात्र घराबाहेर आईची चप्पल होती. त्यामुळे तिने कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी तिला तिची आई बेशुद्धावस्थेत तिथे पडल्याचे दिसून आले. हा प्रकार स्थानिक रहिवाशांकडून समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. ज्योतीला पोलिसांनी तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात तिची अज्ञात व्यक्तीने गळा आवळून हत्या केली होती. हत्येनंतर मारेकरी बाहेरुन कुलूप लावून पळून गेला होता.
या घटनेनंतर एकता जाधव हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या हत्येची पोलीस आयुक्त देवेन भारती, सवहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांनी गंभीर दखल घेत मलबार हिल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त सुमन चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर गोरवे, पोलीस निरीक्षक दिगंबर बिडवे, अब्दुल कादर मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मोहिते, रजीत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजीत मोहिते, विकास बेंडभर, रघुनाथ गायकवाड, अक्षय चौगुले, पोलीस हवालदार लक्ष्मण गुजरे, संजय चव्हाण, भानुदास यादव, नरेंद्र कांबळे, रामेश्वर माचेवाड, सुशांत पवार, पोलीस शिपाई आशिष घोरपडे, श्रेयस बोटके, अशोक फडतरे, सुरज कांबळे, विनित सावंत, तन्मय सावंत, जगदेश यांनी तपास सुरु केला होता.
परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी मोहम्मद कैफ याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच ही हत्या केल्याचे उघडकीस आले. मोहम्मद कैफ हा ज्योती पवार हिच्याकडे भाडेकरु म्हणून राग होता. त्याने शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुक केली होती. त्यात त्याला प्रचंड नुकसान झाले होते. त्याला पैशांची गरज होती. ज्योती पवार हिच्या अंगावर सोन्याचे दागिने पाहून त्याने तिच्या घरी चोरीची योजना बनविली होती.
ठरल्याप्रमाणे तो शुक्रवारी रात्री तिच्या घरी गेला होता. तिची हत्या करुन त्याने त्याने तिच्या अंगावरील तसेच कपाटातील सुमारे नऊ लाखांचे दागिने चोरी करुन पलायन केले होते. हत्येनंतर मोहम्मद कैफ हा पळून गेला होता, हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याचा पोलिसांनी शोध घेतला आणि त्याला काही तासांत ताब्यात घेतले. चौकशीनंतर या हत्येचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. त्याच्याकडून चोरीचा बहुतांश मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला सोमवारी लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे.