महाराष्ट्र लोकभवन येथे २६ वर्षांच्या पोलीस शिपायाची आत्महत्या
स्वतच्या सर्व्हिस रायफलमधून गोळी झाडून जीवन संपविले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ जुलै २०२६
मुंबई, – मुंबईतील अतिसुरक्षित असलेल्या महाराष्ट्र लोकभवन येथे कर्तव्यावर असलेल्या एका २६ वर्षांच्या पोलीस शिपायाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कौस्तुभ सांगळे असे या पोलीस शिपायाचे नाव असून तो सध्या कोल्हापूर राज्य राखीव पोलीस दल क्रमांक सोळामध्ये कार्यरत होता. त्याच्याकडे पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नाही, त्यामुळे त्याने आत्महत्या का केली याचा उलघडा होऊ शकला नाही. याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. कौस्तुभच्या आत्महत्येची माहिती त्याच्या कुटुंबियांसह नातेवाईकांना देण्यात आली आहे. त्यांच्यासह त्याच्या जवळच्या सहकार्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीतून त्याच्या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबईतील मलबार हिल येथील महाराष्ट्र लोकभवन हा परिसरात अत्यंत महत्त्वाचा तसेच सुरक्षित परिसर म्हणून ओळखला जात होता. याच ठिकाणी कौस्तुभ हा सध्या कर्तव्याावर होता. तो कोल्हापूरच्या राज्य राखीव पोलीस दल क्रमांक सोळामध्ये पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होता. काही वर्षांपूर्वीच तो पोलीस दलात दाखल झाला होता आणि त्याला महाराष्ट्र लोकभवन येथे पोस्टिंग देण्यात आली होती. सोमवारी तो नेहमीप्रमाणे कामावर हजर झाले होते. काही वेळानंतर त्याने स्वतच्या सर्व्हिस रायफलमधून गोळी झाडली होती. अचानक झालेल्या गोळीबाराच्या आवाजाराने तिथे उपस्थित पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी त्यांना कौस्तुभने स्वतच्या सर्व्हिस रायफलमधून स्वतवर गोळी झाडल्याचे दिसून आले.
रक्तबंबाळ झालेल्या कौस्तुभला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसह मलबार हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्याचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी जे. जे हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल मंगळवारपर्यंत येण्याची शक्यता आहे. कौस्तुभने आत्महत्या का केली याचा खुलासा होऊ शकला नाही. त्यामुळे पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नाही. त्याला कामाचा ताण होता, काही कौटुंबिक समस्या होती, तो मानसिक तणावात होता का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
त्याच्या सहकार्यासह कुटुंबियांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीतून काही गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. सोमवारी घडलेल्या या घटनेने महाराष्ट्र लोेकभवन येथे कार्यरत असलेल्या पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली होती. कौस्तुभ सांगळेच्या आत्महत्येला पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांनी दुजोरा दिला आहे.