एक कोटीवर तीस दिवसांत दिड कोटी देण्याच्या आमिषाने गंडा
गुंतवणुकीच्या नावाने गंडा घालणार्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१२ जुलै २०२६
मुंबई, – ट्रेड प्रॉफिट फंड या योजनेत एक कोटीची गुंतवणुक केल्यास तीस दिवसांत दिड कोटी रुपये देण्याचे दाखवून पुण्यातील व्यक्तीची एका टोळीने सुमारे एक कोटीची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार काळबादेवी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या टोळीशी संबंधित सात ते आठजणांविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या आरोपींमध्ये शुभम विनेश राऊत,तन्वेश प्रदीपकुमार पाटील, राजेंद्र सिंग, प्रकाश सिंग, आकाश दुबे याचा समावेश आहे. या टोळीने अशाच प्रकारे अनेकांना कोट्येवधी रुपयांना गंडा घातल्याचे बोलले जात आहे.
मोहसीन यासीन मुलानी हे मूळचे सिंधुदुर्गच्या सावंतवाडीचे रहिवाशी रहिवाशी असून सध्या ते त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत पुण्यातील हिंजवडी परिसरात राहतात. पुण्यातील एका खाजगी कंपनीत ते नोकरीस होते, नंतर त्यांनी ती नोकरी सोडून दिली. त्यांची पत्नी प्राची ही एका खाजगी कंपनीत मार्केटिंग हेड म्हणून कामाला आहे. आदनान इमानदार हा त्यांच्या परिचित असून ते दोघेही गेल्या २८ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. त्याच्याकडून त्यांना शुभम राऊतविषयी माहिती मिळाली होती. शुभम हा ट्रेड प्रॉफिट नावाची गुंतवणुक योजना चालवत असून या योजनेत गुंतवणुक केल्यास त्यांना चांगला फायदा होईल. त्यात किमान एक कोटी रुपयांची गुंतवणुक करावी लागत असल्याचे सांगितले होते. याच योजनेबाबत त्यांची शुभमची भेट झाली होती.
या भेटीदरम्यान त्याने त्यांना विविध ट्रेड प्रॉफिट फंड नावाने चालणार्या योजनेची माहिती दिली. योजनेत एक कोटीची गुंतवणुक केल्यास तीस दिवसांत दिड कोटी रुपये मिळतील. या गुंतवणुकीनंतर त्यांना रिझर्व्ह बँकेचे इन्हवेस्टमेंट सर्टिफिकेट आणि क्लेम सर्टिफिकेट मिळणार असल्याचे होते. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने त्यांना काही पावत्या दाखविल्या होत्या. या पावत्या पाहिल्यानंतर या योजनेत काही लोकांनी सुमारे तीस कोटीची गुंतवणुक केल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनीही त्याच्याकडे एक कोटी रुपये गुंतवणुकीची तयारी दर्शविली होती. याबाबत त्यांची त्यांचे मित्र स्वप्नील काळे आणि पत्नी प्राची सविस्तर चर्चा केली असता त्यांनी गुंतवणुकीसाठी आपण इच्छुक असल्याचे सांगिलते. त्यामुळे स्वप्नीलने त्यांना ४५ लाख तर प्राचीने ५५ लाख रुपये दिले होते. एक कोटीची व्यवस्था झाल्याचा सांगितल्यानंतर शुभमने त्यांना २५ मेला मुंबईत येण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे मोहसीन हे मुंबईत आले होते.
काळबादेवी मेट्रो जंक्शनजवळ त्यांची शुभमशी भेट झाली. यावेळी त्याच्यासोबत इतर काहीजण होते. काही वेळानंतर ते सर्वजण श्री भवानी कुरिअरच्या कार्यालयात गेले. ही रक्कम घेतल्यानंतर त्यांनी त्यांना एक कोटी रुपये घेतल्याची पावती दिली. त्यानंतर शुभम हा त्याच्या सहकार्यासोबत बीकेसी येथे निघून गेला. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी त्यांना दिड कोटी रुपये परताव्यासह परत केले नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर शुभमने त्यांना आणखीन दिड कोटी रुपये गुंतवणुक केल्यास दोन कोटी रुपये देण्याचे आमिष दाखविले होते, तसेच त्यांचे दोन्ही पेमेंट एकाच वेळेस करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र त्यांनी पहिला व्यवहार पूर्ण झाल्याशिवाय दुसरा व्यवहार करणार नाही असे सांगून आणखीन गुंतवणुक करण्यास नकार दिला. त्यानंतर शुभम वेगवेगळे कारण सांगून पैसे देण्यास टाळू लागला होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी घडलेला प्रकार एल. टी मार्ग पोलिसांना सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर शुभमसह त्याला याकामी मदत करणार्या तन्वेश पाटील, राजेंद्र सिंग आणि प्रकाश सिंग व इतर तीन ते चार आरोपीविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. अशा प्रकारे फसवणुक करणारी ही सराईत टोळी असून त्यांनी इतर काही व्यक्तींची फसवणुक केल्याचे बोलले जाते.