मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ जुलै २०२६
मुंबई, – नामांकित दूध कंपन्यांच्या दूधात भेसळ करुन भेसळयुक्त दूधाची विक्री करणार्या आणखीन एका टोळीचा गुन्हे शाखेच्या कांदिवली युनिटने पर्दाफाश केला. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. कृष्णय्या व्यकय्या लिंगमप्रल्ल ाअणि रवी कन्हैया पतीपाका अशी दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी दूधात भेसळ करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले तर ५५८ भेसळयुक्त दूध नष्ट केल्याचे वरिष्ठ पोलीस शशिकांत जगदाळे यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांत मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात दूधात भेसळ करुन भेसळयुक्त दूधाची विक्री होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची शहानिशा करुन पोलिसांकडून संबंधित दूध भेसळ करणार्या आरोपीविरुद्ध कारवाई केली जात होती. मात्र या कारवाईनंतर दूधात भेसळ करणार्या काही टोळ्या सक्रिय असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे अशा टोळ्याविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना गोरेगाव येथील येथील लिंक रोड, तीनडोंगरी, प्रेमनगर परिसरात काहीजण दूधात भेसळ करुन भेसळयुक्त दूधाची विक्री करत असल्याची माहिती कांदिवली युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती.
या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र अडाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, विश्वास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला थोरात, दादासाहेब बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे, सहाय्यक फौजदार सुर्वे, पोलीस हवालदार गोवळकर, खताते, खांडेकर, सानप, पोलीस शिपाई वरठा, अन्न सुरक्षा अधिकारी जयकुमार प्रदीप पाटील व त्यांच्या पथकाने प्रेमनगरच्या अंकुर इमारतीजवळील सिद्धीविनायक सेवा मंडळ सोसायटीच्या एका रुममध्ये छापा टाकला होता.
यावेळी तिथे दूधात भेसळ करताना कृष्णाय्या लिंगमप्रल्ल आणि रवी पतीपाका या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासात ते दोघेही नामांकित दूध कंपन्याच्या दूधधात भेसळ करुन भेसळयुक्त दूधाची परिसरात विक्री करत असल्याचे उघडकीस आले. घटनास्थळाहून पोलिसांनी ५५८ लिटर भेसळयुक्त दूधासह दूधात भेसळ करण्यासाठी लागणारे साहित्य असा ३९ हजार ५०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या दोघांविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय सहिता, अन्न सुरक्षा व मानदे कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत या दोघांना अटक करुन किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून गोरेगावसह अन्य ठिकाणी इतर कोणी दूधात भेसळ करत आहेत का याची माहिती जाणून घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहे.