क्षुल्लक वादातून २४ वर्षांच्या लहान भावाला चाकूने भोसकले

हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत मोठ्या भावाला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ जुलै २०२६
मुंबई, – क्षुल्लक वादातून झालेल्या भांडणात शिवशंकर रविंद्र कामकर या २४ वर्षांच्या भावाच्या पोटात त्याच्या मोठ्या भावाने चाकूने भोसकल्याची घटना कांदिवलीतील चारकोप परिसरात घडली. या हल्ल्यात तो गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच आरोपी मोठा भाऊ मोहन रविंद्र काटकर याला चारकोप पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मित्रासोबत राहू नकोस असे सांगितल्यावरुन रागाच्या भरात आरोपी भावाने त्याच्या लहान भावावर हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बळवंतराव यांनी सांगितले.

ही घटना मंगळवारी रात्री बारा वाजता कांदिवलीतील चारकोप, भाबरेकरनगर एसआरए सोसायटीमध्ये घडली. याच सोसायटीच्या २०६/४ मध्ये शिवशंकर आणि मोहन कामकर हे दोघेही बंधू राहत असून शिवशंकर हा हेल्पर म्हणून काम करतो. मोहनचा मंजित नावाचा एक मित्र असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्या संपर्कात राहू नकोस, त्वाच्याशी जास्तीत जास्त लांब राहण्याचा प्रयत्न कर असे शिवशंकरने मोहनला सांगितले होते. मंगळवारी रात्री बारा वाजता याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. यावेळी मोठ्या भावाला शिकवतो, तु जास्त शहाणा झालास का, आता तुला जिवंत सोडत नाही असे बोलून मोहनने शिवशंकरच्या पोटात दोन वेळा चाकूने भोसकले. त्यात शिवशंकर हा गंभीररीत्या जखमी झाला होता.

हा प्रकार स्थानिक रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी जखमी झालेल्या शिवशंकरला तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहे. या हल्ल्यानंतर मोहन कामकर हा स्वतहून चारकोप पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. शिवशंकरची पोलिसांनी जबानी नोंदवून त्याच्या तक्रारीवरुन त्याचा मोठा भाऊ मोहन कामकर याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला शनिवार १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावलयचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बळवंतराव यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page