मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ जुलै २०२६
मुंबई, – शिवडीतील एका मोबाईल शॉपमध्ये सुमारे २१ लाखांची घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात व्यक्तीने शॉपचे कुलूप तोडून विविध कंपन्याचे ३५ हून अधिक मोबाईल आणि कॅश घेऊन पलायन केले. याप्रकरणी रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून याच फुटेजवरुन आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना मंगळवार १४ जुलैला रात्री साडेनऊ ते बुधवार १५ जुलै सकाळी अकराच्या सुमारास शिवडीतील टी जे रोड, टी जे अपार्टमेंटच्या भवाल इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये घडली. प्रणय श्रैणिक जैन हा मोबाईल व्यावसायिक असून तो भोईवाडा परिसरात राहतो. त्याच्या वडिलांच्या मालकीचे शिवडी परिसरात भवाल इलेक्ट्रॉनिक नावाचे एक शॉप आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो त्याच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळतो. मंगळवारी दिवसभर काम करुन रात्री साडेनऊ वाजता तो त्याच्या कर्मचार्यासोबत घरी निघून गेला होता.
दुसर्या दिवशी सकाळी अकरा वाजता तो दुकानात आला होता. यावेळी त्याला दुकानाचे दोन्ही लॉकचे क्लिप आणि सेंटर लॉक तुटलेले दिसून आले. त्याने आत जाऊन पाहणी केली असता मोबाईल शॉपमधून सुमारे वीस लाख रुपयांचे विविध कंपन्यांचे ३५ मोबाईल आणि सत्तर हजाराची कॅश असा २० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात व्यक्तीने चोरी करुन पलायन केल्याचे निदर्शनास आले. चोरीचा हा प्रकार उघडकीस येताच त्याने रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर प्रणय जैन याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. बुधवारी सकाळी उघडकीस आलेल्या या चोरीच्या घटनेने स्थानिक व्यापारी वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.