महसूल-वन विभागात नोकरीच्या आमिषाने गंडा घालणारे त्रिकुट गजाआड

आरोपीविरुद्ध मुंबईसह ठाणे, ठाणे ग्रामीण, हिंगोलीत अनेक गुन्हे दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० जुलै २०२६
भिवंडी, – महसूल आणि वन विभागात नोकरीच्या आमिषाने गंडा घालणार्‍या एका त्रिकुटाला भिवंडी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. शाम विठोबा खतकर, जुगलकुमार लोडाया ऊर्फ लोधिया आणि रविंद्र दयानिशी शंखुआ अशी या तिघांची नावे असून ते सर्वजण मुंबईसह ठाण्यातील रहिवाशी आहे. तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध मुंबईसह ठाणे, ठाणे ग्रामीण, हिंगोली येथील विविध पोलीस ठाण्यात घरफोडी, घातक शस्त्रे बाळगणे, बोगस दस्तावेज बनवून अपहारासह फसवणुक करणे आदी गुन्ह्यांची नोंद आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्यांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. नोकरीच्या आमिषाने या टोळीने आतापर्यंत अनेकांना गंडा घातला असून त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

यातील तक्रारदार दर्शन संतोष पाटील हे भिवंडीतील रेतीबंदर रोड, काल्हेर गावचे रहिवाशी आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांची शामशी ओळख झाली होती. त्याने त्यांना त्याची मंत्रालयातील विविध विभागात ओळख असल्याचे सांगून त्यांना महसूल किंवा वन विभागात वरिष्ठ पदावर नोकरी मिळवून देतो असे आमिष दाखविले होते. याच नोकरीसाठी त्याने त्यांच्याकडून टप्याटप्याने सत्तर लाख रुपये घेतले होते. काही दिवसांनी त्यांना मंत्रालयातील वरिष्ठ दर्जाच्या अधिकार्‍याच्या नावाने सही आणि शिक्के तसेच राजमुद्रा असलेले बोगस नोकरीचे नियुक्तीपत्र दिले होते. त्यात त्यांची वरिष्ठ टंकलेखक म्हणून नेमणूक झाल्याचे नमूद करण्यात आले होते. संबंधित नियुक्तीपत्र बोगस असल्याचे नंतर दर्शन पाटील यांच्या लक्षात आले होते.

नोकरीच्या आमिषाने शाम खतकरसह त्याच्या इतर सहकार्‍यांनी त्यांची फसवणुक केली होती. त्यांच्याकडून घेतलेल्या सत्तर लाखांचा अपहार करुन ते सर्वजण पळून गेले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी भिवंडी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित आरोपीविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून सत्तर लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले यांनी गंभीर दखल घेत या गुन्ह्यांचा तपास भिवंडी गुन्हे शाखा घटक क्रमांक दोनकडे सोपविण्यात आला होता. तपास हाती येताच या पथकाने गुन्ह्यांतील आरोपींची माहिती काढून त्यांच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती.

ही शोधमोहीम सुरु असताना पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बगाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक् शितल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुंभार, श्रीराज माळी, मिथुन भोईर, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर चौधरी, पोलीस हवालदार सुदेश घाग, शिवाजी मुर्तडक, प्रशांत राणे, प्रकाश पाटील, साबीर शेख, निलेश बोरसे, राजेश गावडे, वसंत चौरे, शशिकांत यादव, महिला पोलीस हवालदार माया डोंगरे, आश्‍विनी पाटील, दक्षता सुतार, सायली गंभेरा, पोलीस शिपाई संजय चव्हाण, अमोल इंगळे, विजय कुंभार, भावेश घरत, नितीन नंदिवले, सर्फराज तडवी यांनी वेगवेगळ्या परिसरात शाम खतकर, जुगलकुमार लोडाया आणि रविंद्र शंखुआ या तिघांना ताब्यात घेतले होते.

यातील शाम हा मुंबईतील प्रभादेवी, सदाशिव जानू पत्रा चाळ, जुगलकुमार डोबिवलीतील कोपर रोड, द्रोपदी निवास तर रविंद्र कल्याणच्या चिंचपाडा रोड, नंदू परब चाळीत राहतो. चौकशीत या तिघांनी तक्रारदार दर्शन पाटीलला नोकरीच्या आमिषाने सत्तर लाखांना गंडा घातल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी मंत्रालयातील विविध विभागाचे वरिष्ठ अधिकार्‍यांच्या नावे आणि शिक्के असलेले बोगस लेटर हेड, शिक्के जप्त केले आहेत. नोकरीच्या आमिषाने गंडा घालणारी ही सराईत टोळीने आहे. या टोळीने आतापर्यंत अनेकांची फसवणुक केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.

तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यापैकी शाम खतकरविरुद्ध मुंबईतील एमएचबी, दादर, कफ परेड, विनोबा भावे नगर, कोपरी, काशिमिरा, सावंतवाडा पोलीस ठाण्यात घरफोडी, घातक शस्त्रे बाळगणे, बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक करणे अशा नऊ, जुगलकुमार लोडयाविरुद्ध कफ परेड आणि वर्तकनगर तर रविंद्र शंखुआविरुद्ध वर्तकनगर व बसमत पोलीस ठाण्यात चोरीसह फसवणुक, बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक करणे अशा प्रत्येकी दोन गुन्ह्यांची नोंद आहे.

या आरोपींनी मंत्रालयातील विविध विभागाचे सही आणि शिक्के असलेले लेटर हेड कोठून मिळविले, याकामी त्यांना कोणी मदत केली याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. अटक आरोपींचे इतर काही सहकार्‍यांची नावे तपासात समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page