विक्रोळीतील रिल्स क्रियेटरच्या अपहरणाच्या गुन्ह्यांत चौघांना अटक
बेटींग ऍपच्या विरोधात जनजागृती करतो म्हणून अपरहण केल्याची कबुली
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ ऑगस्ट २०२६
मुंबई, – विक्रोळीतील एका रिल्स क्रियेटरच्या अपहरणाच्या गुन्ह्यांत चारजणांच्या एका टोळीला पवई पोलिसांनी अटक केली. यश रणधीर बाबरे, प्रतिक राम शिंदे, अनिकेत राम गोडसे आणि समीर सुनिल कुचेकर ऊर्फ एस. के अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. बेटींग ऍपच्या विरोधात जनजागृती करतो म्हणून या चौघांनी या रिल्स क्रियेटरचे अपहरण करुन त्यांना बेदम मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
चेतन चंद्रकांत देवलकर हे विक्रोळीतील एलबीएस रोड, अजिंक्यतारा सोनावणे चाळीत राहत असून फ्रिलासन्सिंग म्हणून काम करतात. त्यांचे इंटाग्रामवर एक अकाऊट असून ते वेगवेगळ्या विषयांवर रिल्स बनवून स्वतच्या अकाऊंटवर अपलोड करतात. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मिडीयावर काही लोक अनेकांना बेटींग ऍप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करत होते. हा प्रकार चुकीचा असल्याने त्यांनी त्यांच्या अकाऊंटवरुन जनजागृतीसाठी काऊंटर रिल्स बनविण्यास सुरुवात केली होती. दुसरीकडे प्रतिक शिदे हा बेटींग ऍपचे प्रमोशन करत असल्याने त्यांच्यात सोशल अकाऊंटवरुन वाद सुरु झाला होता. त्यामुळे प्रतिक शिंदेच्या बेटींग ऍपच्या प्रमोशनसाठी करण्यात आलेले रिल्स व स्टोरींना रोस्ट करु नये म्हणून चेतन देवलकर यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकी दिली जात होती. या धमकीनंतरही त्यांनी सोशल मिडीयावर जनजागृती मोहीम सुरु ठेवली होती.
२६ जुलैला सायंकाळी साडेसात वाजता चेतन देवलकर हे पवईतील पंचकुटीर या ठिकाणी कामासाठी आले होते. यावेळी त्यांच्याकडे यश बाबरे आला आणि त्याने त्याला काही अंतरावर उभ्या स्कॉपिओ कारजवळ आणले. यावेळी कारमध्ये असलेल्या इतर आरोपींना त्यांचे मान पकडून त्यांना कारमध्ये जबदस्तीने बसवून त्यांचे अपहरण केले होते. त्यांचा तोंड दाबून त्यांच्या गळ्यावर पाय आणि चाकू ठेवून आरोपींनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. इतकेच नव्हे तर कारमध्ये त्यांना शिवीगाळ करुन लाथ्याबुक्यांनी तसेच लाकडी दांड्याने बेदम मारहाण करण्यात आली होती. यावेळी कार अनिकेत चालवत होता इतर तिघेही त्यांना मारहाण करत होते. आमच्या बेटींग ऍपच्या विरोधात व्हिडीओ बनवतोस, तुला जर ऍपचे प्रमोशन करायचे असेल तर कर, पण आमच्या विरोधात व्हिडीओ बनवून नकोस. नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली.
या धमकीनंतर रात्री साडेअकरा वाजता त्यांनी त्यांना कळंबोली येथून सोडून पलायन केले होते. मारहाणीत चेतन देवलकर यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांनी प्राथमिक औषधोपचार करुन पवई पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध अपहरणासह गंभीर दुखापत करणे, शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या घटनेची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी गंभीर दखल घेत पवई पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त दादासाहेब घुटूकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक माने व गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमेहीम सुरु असताना विक्रोळी, पुणे आणि सातारा येथून चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच चेतन देवलकर यांचे अपहरण करुन त्यांना कारमध्ये बेदम मारहाण केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या चौघांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. यातील यश हा विक्रोळीतील सूर्यानगर, प्रतिक पुण्याच्या इंद्रापूर, समीर चिखली तर अनिकेत सातारा, फलटणचा रहिवाशी आहे. अटकेनंतर चारही आरोपींना अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.