लोकलमध्ये बसण्याच्या जागेवर महिलेचा विनयभंग करुन मारहाण
सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल होताच आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ ऑगस्ट २०२६
मुंबई, – छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ते गोरेगाव लोकल प्रवासादरम्यान बसण्याच्या जागेवर एका महिलेला शिवीगाळ करुन तिचा विनयभंग करुन मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात विनयभंगासह शिवीगाळ करुन मारहाण केल्याचा गुन्हा दाखल होताच काही तासांत मोहम्मद रिझवान अन्सारी या ३६ वर्षांच्या आरोपीस अंधेरी रेल्वे पोलिसांनी अटक केली. सोशल मिडीयावर या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल होताच रेल्वे पोलिसांनी तातडीने कारवाई करुन या आरोपीला अवघ्या बारा तासांत गजाआड केले.
मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये काही दिवसांपूर्वी क्षुल्लक वादातून एका तरुणाची हत्या केली होती. या हत्येच्या घटनेनंतर रेल्वे पोलिसानी जास्तीत जास्त गस्तवर भर दिला होता. तरीही लोकलमध्ये क्षुल्लक कारणावरुन मारहाणीचे प्रकार घडत आहेत. गुरुवारी सोशल मिडीयावर असाच एक मारहाणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता सीएसएमटी-गोरेगावदरम्यान धावणार्या हार्बर रेल्वेच्या एका उपनगरीय लोकलमध्ये बसण्याच्या वादातून एका महिलेचा आरोपी व्यक्तीसोबत वाद झाला होता. या वादानंतर आरोपीने महिलेला शिवीगाळ करुन मारहाण केली, तिच्याशी हुज्जत घालून तिचा विनयभंग केला होता.
विशेष म्हणजे लोकलमध्ये इतर पुरुष प्रवाशी होते, मात्र त्यापैकी कोणीही प्रवाशी महिलेच्या मदतीसाठी पुढे आला नाही. मात्र एका दक्ष नागरिकाने त्याच्या मोबाईलवर संबंधित प्रकाराचा व्हिडीओ काढला होता. तो व्हिडीओ नंतर त्याने सोशल मिडीयावर अपलोड केला होता. हा व्हिडीओ व्हायरल होताच त्याची पोलीस आयुक्त राकेश एम कलासागर, पोलीस उपायुक्त सुनिता ठाकरे यांनी गंभीर दखल घेत रेल्वे पोलिसांना चौकशी करुन तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वडाळा रेल्वे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना या पथकाने गोवंडी येथे राहणार्या मोहम्मद रिझवान अन्सारी या आरोपीस ताब्यात घेतले. याच दरम्यान अंधेरी पोलिसांनी तक्रारदार महिलेचा शोध घेऊन तिची जबानी नोंदवून घेतली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी मोहम्मद रिझवानविरुद्ध विनयभंगासह शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. हा प्रकार जोगेश्वरी रेल्वे स्थानकादरम्यान घडल्याने त्याचा तपास अंधैरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गवते यांनी दुजोरा दिला आहे.