४५ लाखांच्या चोरीच्या मुद्देमालासह रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक

एमएचबी पोलीस ठाण्यातील सहा घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ ऑगस्ट २०२६
मुंबई, – सुमारे ४५ लाखांच्या चोरीच्या मुद्देमालासह घरफोडीच्या गुन्ह्यांतील एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला एमएचबी पोलिसांनी अटक केली. कमलजीत कुलजीत सिंग ऊर्फ सनी असे या आरोपीचे नाव असून त्याच्या अटकेने एमएचबी पोलीस ठाण्यातील सहा घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

गेल्या काही वर्षांत एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्याने लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. या वाढत्या घरफोडीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत एमएचबी पोलिसांह स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु केला होता. काही फुटेजमध्ये कमलजीत सिंग हा रेकॉर्डवरील गुन्हेगार दिसून आला आहे. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग असण्याची शक्यता असल्याने त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना कमलजीत हा नवी मुंबईत लपला असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.

या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर हुंबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिलिंद नागपुरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप वत्रे, पोलीस हवालदार साळुंखे, पोलीस शिपाई ढामळे, पवार, मस्के, घाडगे आदी पथकाने नवी मुंबईत साध्या वेशात पाळत ठेवली होती. तिथे गेलेल्या पोलीस पथकाला तो गुजरातमार्गे राजथानच्या जयपूरला पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे समजले. त्यानंतर या पथकाने गुजरात पोलिसांच्या पथकाने कमलजीतला नियोजल चेक पोस्ट परिसरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले.

तपासात कमलजीत हा घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध दादर, माहीम, काळाचौकी, आरसीएफ, धारावी, माहीम, भायखळाा, खेरवाडी, मानपाडा पोलीस ठाण्यात अनेक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. यातील बहुतांश गुन्ह्यांत त्याच्यावर अटकेची कारवाई झाली होती. मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पुन्हा दिवसा रेकी करुन रात्रीच्या वेळेस घरफोडी करत होता. चालू वर्षांत त्याने एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली.

या गुन्ह्यांतील ४५ लाख २५ हजार ६९० रुपयांचा चोरीचा मुद्देमाल त्याच्याकडून पोलिसांनी जप्त केला आहे. त्यात ४४ लाख १२ हजार ६२० रुपयांचे ३२९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ७० हजार रुपयांची कॅश, एक मोबाईल, मनगटी घड्याळ आदी मुद्देमालाचा समावेश आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. त्याच्या अटकेने अशाच इतर काही घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page