माटुंगा-वाडीबंदर येथून १.८० कोटींच्या ड्रग्जसहीत दोघांना अटक
अटक आरोपीमध्ये एका नायजेरीयन नागरिकाचा समावेश
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ ऑगस्ट २०२६
मुंबई, – माटुंगा आणि वाडीबंदर येथील दोन वेगवेगळ्या कारवाईत ऍण्टी नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्यांनी दोन ड्रग्ज तस्करांना अटक केली. त्यात एका नायजेरीयन नागरिकाचा समावेश आहे. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी कोकेनसह एमडीएमए ड्रग्जच्या गोळ्या जप्त केल्या असून त्याची आंतररराष्ट्रीय बाजारात १ कोटी ८० लाख ३० हजार रुपये इतकी किंमत आहे. या दोघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर दोन्ही आरोपींना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
वाडीबंदर परिसरात काही नायजेरीयन नागरिक ड्रग्ज तस्करी करत या आरोपींकडे मोठ्या प्रमाणात कोकेनचा साठा आहे. याच कोकेनची डिलीव्हरीसाठी काही नायजेरीयन नागरिक वाडी परिसरात येणार असल्याची माहिती वरळी युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्क्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरळी युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमीत घोगरे, पोलीस उपनिरीक्षक मुकूंद जाधव व अन्य पोलीस पथकाने भारत पेट्रोलियम कंपनीजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती.
गुरुवारी रात्री उशिरा तिथे एक नायजेरीयन नागरिक आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना १५३ ग्रॅम वजनाचे उच्च प्रतीचे कोकेन सापडले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत १ कोटी ५३ लाख रुपये इतकी आहे. त्याच्याविरुद्ध नंतर एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत शुक्रवारी सकाळी त्याला पोलिसांनी अटक केली.
ही कारवाई ताजी असताना माटुंगा येथून आझाद मैदान युनिटच्या अधिकार्यांनी एका तरुणाला अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी ६८ ग्रॅम वजनाचे १०० एमडीएमए ड्रग्जच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. त्याची किंमत २७ लाख ३० हजार रुपये इतकी आहे. माटुंगा येथील फाईव्ह गार्डन, १२ एडनवाला रोड, सिमा शुल्क निवास बंगलोजवळ काहीजण ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती आझाद मैदान युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक शैलेश सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद आवळे, पोलीस उपनिरीक्षक जुईकर, राम लिंगे, पोलीस हवालदार पपाटील, चव्हाण, प्रभू, ढोरे, करांडे, पोलीस शिपाई गोसावी, शिंदे, सिंह आणि कांबळे यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून ही कारवाई केली होती.
एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई केल्यानंतर दोन्ही आरोपींना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यांच्या इतर सहकार्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.