प्रशासकीय अधिकार्‍याच्या २० वर्षांच्या मुलाची आत्महत्या

मानसिक तणावातून बाराव्या मजल्यावरुन उडी घेऊन जीवन संपविले

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ ऑगस्ट २०२६
मुंबई, – राजस्थानच्या जयपूर शहरात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या एका अधिकार्‍याच्या वीस वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना ताडदेव परिसरात घडली. कार्तिकयन चौधरी असे या तरुणाचे नाव असून मानसिक तणावातून त्याने स्वतच्या निवासी इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन उडी घेऊन जीवन संपविले. घटनास्थळी पोलिसांना सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे आत्महत्येचे अधिकृत कारण समजू शकले नाही. मात्र मानसिक तणावातून आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ही घटना सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता ताडदेव येथील आदित्य हाईट्स या इमारतीमध्ये घडली. या इमारतीच्या बाराव्या मजल्यावर कार्तिकयन चौधरी हा त्याच्या आई-वडिल आणि बहिणीसोबत राहत होता. त्याचे वडिल जयपूर शहरात एका विभागात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तो स्वत बीए इकॉनॉमीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याला हदयाला होल होते, त्यावर त्याच्यावर औषधोपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून कार्तिकयन हा मानसिक तणावात होता. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता राहत्या घरातून उडी घेतली होती.

हा प्रकार लक्षात येताच स्थानिक रहिवाशांनी ही माहिती ताडदेव पोलिसांना दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्याकडे पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे त्याने आत्महत्या का केली याचा उलघडा होऊ शकला नाही.

याप्रकरणी त्याच्या आईसह बहिणीची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून त्यात त्यांनी कार्तिकयन काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने बाराव्या मजल्यावरुन उडी घेऊन जीवन संपविल्याचे जबानीत म्हटले आहे. या जबानीनंतर पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. कार्तिकयनच्या आत्महत्येने आदित्य हाईट्स अपार्टमेंटमधील स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page