१.५८ कोटीच्या हिर्यांचा अपहार करुन हिरे व्यापार्याची फसवणुक
आरोपी व्यापार्याकडून अन्य हिरे व्यापार्याची फसवणुक झाल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ ऑगस्ट २०२६
मुंबई, – हिरे खरेदी करणार्या एका चांगल्या ग्राहक कंपनीला तातडीने हिर्यांची गरज असल्याची बतावणी करुन १ कोटी ५८ लाखांच्या हिर्यांचा अपहार करुन एका हिरे व्यापार्याची त्याच्याच मित्राने फसवणुक केल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी संजयकुमार सावजीभाई गोटी या आरोपी मित्राविरुद्ध बीकेसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. संजयकुमार हा हिरे व्यापारी असून त्याची एच. के डियाम नावाची कंपनी आहे. त्याने तक्रारदार व्यापार्यासह अन्य काही हिरे व्यापार्याकडून कोट्यवधी रुपयांचे हिरे घेऊन त्यांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
भौदीप पोपटलाल देसाई हे हिरे व्यापारी असून सध्या विलेपार्ले परिसरात राहतात. त्यांची धु्रव स्टार नावाची हिरे खरेदी-विक्रीची कंपनी असून या कंपनीचे सर्व आर्थिक व्यवहार वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्समध्ये चालते. संजयकुमार हादेखील हिरे व्यापारी असून भौदीप देसाई त्यांना गेल्या सहा वर्षांपासून ओळखतात. त्याच्यासोबत त्यांचा अनेकदा हिर्यांचा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला होता. १३ एप्रिल २०२६ रोजी संजयकुमार भावेश मोराडिया या ब्रोकरला फोन करुन त्याच्याकडे हिरे खरेदी करणारी ग्राहक कंपनी आहे. त्यासाठी त्याने त्याच्याकडून काही हिर्यांची मागणी केली होती. त्यामुळे भावेश मोराडियाने संजयकुमारच्या सांगण्यावरुन भौदीप देसाई यांच्याकडून १ कोटी ५८ लाख ६४ हजार २२५ रुपयांचे ७५७ कॅरेटचे लुज कट ऍण्ड पॉलिश हिरे क्रेडिटवर विक्रीसाठी घेतले होते. यावेळी संजयकुमारने एका आठवड्यात व्यवहार पूर्ण करुन पेमेंट जमा करण्याचे आश्वासन दिले होते.
एका आठवड्यानंतर संजयकुमारला संपर्क साधल्यानंतर त्याने अद्याप व्यवहार झालेला नाही. लवकरच व्यवहार पूर्ण करुन पेमेंट जमा करतो असे सांगितले. मात्र एक महिना उलटूनही त्याने पेमेंट जमा केले नाही. त्यामुळे भौदीप देसाई यांच्या सांगण्यावरुन भावेश मोराडिया हे त्याच्या एच. के डियाम कंपनीच्या कार्यालयात गेले होते. मात्र संजयकुमार तिथे नव्हता. तो कार्यालय बंद करुन पळून गेला होता. त्याचा फोन बंद येत होता. चौकशीनंतर संजयकुमार भौदीप देसाई यांच्यासह अन्य हिरे व्यापार्याकडून विक्रीसाठी क्रेडिटवर हिरे घेतले होते. मात्र कोणालाही पेमेंट न करता किंवा हिरे परत न करता पलायन केले होते.
हा प्रकार लक्षात येताच भौदीप देसाई यांनी बीकेसी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संजयकुमार गोटी याच्याविरुद्ध क्रेडिटवर घेतलेल्या हिर्यांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.