आधार कार्ड सेंटरमध्ये बोगस दस्तावेज बनविणार्‍या टोळीचा पर्दाफाश

चार आरोपींना बोगस जन्मदाखला, आधारकार्डसह इतर दस्तावेजासह अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१२ ऑगस्ट २०२६
मुंबई, – आधारकार्ड सेंटरमध्ये बोगस दस्तावेज बनविणार्‍या दोन वेगवेगळ्या टोळ्याचा पर्दाफाश करण्यात दहिसर पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आधारकार्ड, जन्माचे दाखले, शाळा सोडल्याचा दाखला, पॅनकार्ड आदी मुद्देमाल हस्तगत केला आहे. बोगस दस्तावेजाची ही टोळी दोन ते अडीच हजारामध्ये विक्री करत होती. विशेष म्हणजे त्यासाठी एकाच बोटांचे फिंगरप्रिट असलेल्या दोन शिक्क्याचा वापर होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सुरजकुमार रामचंद्र यादव, उपेंद्र कप्तान सिंग, सत्यम ललन मिश्राआणि आकाश भगवान पटवा अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या चारही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

दहिसर येथे बोगस आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनविणारी एक टोळी कार्यरत असून या टोळीने आतापर्यंत ठराविक रक्कमेच्या मोबदल्यात अनेकांना बोगस दस्तावेज पुरविल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश साळुंके यांना मिळाली होती. या माहितीची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत दहिसर पोलिसांनी आरोपींच्या अटकेचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी एका डमी आरोपीच्या मदतीने संबंधित माहितीची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला होता. हा डमी ग्राहक दहिसर येथील बालाजीनगर, विद्यामंदिर शाळेजवळील युएस इंटरप्रायजेस कार्यालयात गेला होता. त्याने तिथे स्वतचे आधारकार्डसाठी अर्ज केला होता. त्याच्याकडे कुठलेही कागदपत्रे नसताना तयला कांदिवलीतील हनुमाननगर, सॅम इन्फोटेक आधार सेंटरमध्ये नेण्यात आले होते. तिथे त्याला एक बोगस आधारकार्ड बनवून देण्यात आले होते.

तपासात ही बाब उघडकीस येताच अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, सहाय्यक पोलीस आयुक्त जयराज रणवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक् सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक मारुती सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश साळुंके, पोलीस हवालदार आत्माराम भलकारे, पोलीस शिपाई संतोष भागवत, सुनिल राठोड, संतोष गावडे आदी पोलीस पथकाने दहिसर आणि कांदिवलीतील आधारकार्ड सेंटरमध्ये कारवाई केली होती.

या कारवाईत पोलिसांनी सुरजकुमार आणि उपेंद्र या दोघांना अटक केली. घटनास्थळाहून पोलिसांनी ३२ बोगस जन्मदाखला, सरदार वल्लभभाई पटेल शाळा आणि पायोनिअर कॉलेज ऑफ आर्टस ऍण्ड कॉमर्स महाविद्यालयाच्या मुख्याधापक व प्राचार्य यांचे सही शिक्का असलेले कोरे प्रमाणपत्र, बोटाचे फिंगरप्रिट ठसे असलेले दोन शिक्के आदी मुद्देमाल हस्तगत केला आहे. या गुन्ह्यांत उमेश राजेश यादव ऊर्फ समीर याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

ही कारवाई ताजी असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश साळुंके, पोलीस शिपाई सुनिल राठोड, संतोष गावडे आणि संतोष भागवत यांनी कांदिवलीतील पोईसर परिसरात असलेल्या शिवम इंटरप्रायजेसमध्ये कारवाई केली होती. या ठिकाणाहून पोलिसांनी सत्यम मिश्रा आणि आकाश पटवा या दोघांना अटक केली. ते दोघेही तिथे बोगस जन्मदाखला तसेच इतर शासकीय बोगस दस्तावेज बनवून देत असल्याचे उघडकीस आले. घटनास्थळाहून पोलिसांनी १४ बोगस जन्मदाखला, ७ रहिवाशी दाखला, २६ एसबीआय मेडीकल पॉलिसी, तीन नागरित्व दाखल्याची प्रती, प्रत्येकी दोन संगणक, सीपीयू, किबोर्ड, माऊस, प्रिंटर, भारत शासनाची आधार अपडेट मशिन, आयरिस स्कॅनर, फिंगरप्रिंट स्कॅनर, वेबकॅमेरा आदी मुद्देमाल जप्त केला आहे.

ही टोळी गेल्या एक वर्षांपासून अनेकांना बोगस दस्तावेज बनवून देत होते. दोन्ही ठिकाणाहून पोलिसांनी शंभरहून अधिक बोगस दस्तावेज विक्री केल्याचे पुरावे सापडले होते. विशेष म्हणजे कांदिवलीतील आधारकार्ड सेंटरमधून संबंधित आरोपी बोगस दस्तावेज बनवून प्रत्येक दस्तावेजामागे दोन ते अडीच हजार रुपये घेत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यासाठी एकाच व्यक्तीच्या बोटांचे फिंगरप्रिंट असलेले दोन शिक्के बनविले होते. त्यानंतर एकाच क्रमाकांवरुन अनेकानंा बोगस दस्तावेज दिले जात होते. अटकेनंतर या चौघांनाही बोरिवलीतील लाकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page