म्हाडाच्या पाच घरासह दोन गाळ्यासाठी घेतलेल्या ६४ लाखांचा अपहार

दोन बंधूंसह तिघांना गंडा घालणार्‍या मुख्य आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१२ ऑगस्ट २०२६
मुंबई, – म्हाडाच्या पाच घरासह दोन गाळ्यासाठी घेतलेल्या सुमारे ६४ लाखांचा अपहार करुन दोन बंधूंसह तिघांची त्यांच्याच परिचित आरोपीने फसवणुक केल्याचा प्रकार मुंबई विद्यापीठ परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी स्वर्णसिंह तुफानसिंह पटीयाल ऊर्फ बंटी या मुख्य आरोपीविरुद्ध बोगस दस्तावेज देऊन पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या आरोपीचा शोध सुरु असून त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जाते.

तुकाराम सिताराम कदम हे सांताक्रुजच्या विद्यानगरी मार्ग, मुंबई विद्यापीठ कर्मचारी वसाहतीत राहत असून असून मुंबई विद्यापीठात चालक म्हणून नोकरी करतात. त्यांचा भाऊ विाकस हा साकिनाका येथे राहत असून तो एका खाजगी सिक्युरिटी कंपनीत कामाला आहे. त्याच ठिकाणी स्वर्णसिंह राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. तेरा वर्षांपूर्वी ते भावाकडे गणपती सणानिमित्त गेले होते. यावेळी स्वर्णसिंहने त्यांना कुर्ला, कमानी येथे स्वस्तात घर मिळत असल्याचे सांगितले. यावेळी त्याने त्याला त्यांच्यासह त्यांच्या मित्राबाबत घराविषयी सांगितले होते.

काही दिवसांनी स्वर्णसिंह हा मुंबई विद्यापीठातील कॅण्टीनजवळ आला होता. तिथे त्यांच्यासह त्यांचा मित्र गणेश भिकाजी लाखन यांनी त्याची भेट घेतली होती. यावेळी त्याने त्याची मंत्रालय, तहसिलदार कार्यालय आणिम्हाडामध्ये चांगली ओळख असून त्यांना म्हाडाचे स्वस्तात घर देतो असे सांगितले होते. त्याच्यावर विश्‍वास ठेवून या दोघांनी म्हाडाचा घरासह गाळा घेण्याचा निर्णय घेतला होता. तुकाराम कदम यांनी दोन रुमसह एक गाळा आणि गणेश लाखनने दोन रुम घेण्याबाबत चर्चा केली होती. काही दिवसांनी त्यांनी त्यांना कुर्ला, कमानी येथील म्हाडाच्या काही इमारती दाखवून तिथे त्यांना रुमसह गाळा देण्याचे आश्‍वासन दिले होते.

२०१७ साली तो त्यांना घेऊन मंत्रालयात आला होता. तिथेच त्याने त्यांना घराच्या चाव्या दिल्या. लॉटरी लागल्यानंतर त्यांना घराचे ऍलोटमेंट लेटर दिले जाईल. त्यानंतर त्यांनी घराचा ताबा घ्यावा असे सांगितले. त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्यांनी त्याच्याशी आर्थिक व्यवहार सुरु केला होता. २०२० पर्यंत स्वर्णसिंहला तुकाराम कदम यांनी ३१ लाख ५ हजार तर गणेश लाखन यांनी २२ लाख ७८ हजार ३०० रुपये रोख व ऑनलाईनने दिले होते. याच दरम्यान गणेशने त्याच्या भावासाठी त्याला एक घर देण्याची विनंती केली होती. त्यासाठी त्याने त्याला १० लाख ३५ हजार २१० रुपये कॅश स्वरुपात दिले होते.

अशा प्रकारे तुकाराम कदम, गणेश लाखन, त्याचा भाऊ दिनेश लाखन यांनी त्याला ६४ लाख १८ हजार ५१० रुपयांचे पेमेंट पाच रुम आणि दोन गाळ्यासाठी दिले होते. मात्र २०२४ पर्यंत त्याने घरासह गाळ्याचा ताबा दिला नाही. काही दिवसांनी त्याने पुर्नविकास योजनेतील घराचे अलोटमेंट लेटर दिले, मात्र त्याची शहानिशा केल्यानंतर त्याने दिलेले घराचे लेटर बोगस असल्याचे उघडकीस आले. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र त्याने त्यांना पैसे परत केले नाही. काही दिवसांत पैसे देण्याचे आश्‍वासन देऊन त्याने त्याचे आश्‍वान पाळले नाही.

त्यामुळे त्यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात स्वर्णसिंह पटीयाल याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध म्हाडाच्या पाच घरासह दोन गाळ्यासाठी घेतलेल्या सुमारे ६४ लाखांचा अपहार करुन तिघांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई केली जाईल. स्वर्णसिंहने अशाच प्रकारे इतर काही लोकांना म्हाडाच्या घरासह गाळ्याच्या आमिषाने गंडा घातला आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page