९१ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेच्या मृत्यूप्रकरणी पुतण्याला अटक

बेशुद्ध आजीला औषधोपचारासाठी न नेता दागिने घेऊन पलायन केले

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१३ ऑगस्ट २०२६
मुंबई, – दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून पालूबेन वालजी बाबरिया या ९१ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिच्याच पुतण्याला ताडदेव पोलिसांनी अटक केली. जिग्नेश नारण बाबरिया असे या आरोपी पुतण्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने शनिवार १५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना ८ ऑगस्टला साडेदहा ते बाराच्या सुमारास ताडदेवच्या तुळशीवाडी, आंबेडकर नगरच्या नवरग सोसयटीत घडली. याच सोसायटीच्या रुम क्रमांक १७१२/१७ मध्ये ५८ वर्षांचे टाभजी वालजी बाबरिया हे त्यांची ९१ वर्षांची आई पालूबेन, पत्नी निर्मला, मुलगा चेतन आणि आरोपी पुतण्या जिग्नेश यांच्यासोबत राहतात. पूर्वी ते त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत टोपाझ इमारतीमध्ये राहत होते. यावेळी त्यांच्या घरी त्यांची आई पालूबेन आणि पुतण्या जिग्नेश हे दोघेच राहत होते. जिग्नेशला दारु पिण्याचे व्यसन आहे. तो दारुसाठी पालूबेन यांच्याशी वाद घालत होता. तो त्यांच्या आईचा सांभाळ करत नव्हता. त्यामुळे ते त्यांच्या कुटंबियासोबत एक वर्षांपासून तिथे राहण्यासाठी आले होते. ते तिथे राहण्यासाठी आल्याचे जिग्नेशला आवडत नव्हते. त्यामुळे तो दारुच्या नशेत त्यांच्याशी नेहमीच वाद घालून भांडण करत होता. तो त्यांचा पुतण्या असल्याने त्यांनी त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती.

४ ऑगस्टला त्याने घराच्य मालकी हक्कावरुन त्यांच्याशी पुन्हा वाद घातला होता. त्यांना शिवीगाळ केली होती. पालूबेन यांना गेल्या दोन महिन्यांपासून श्‍वास घेण्याचा त्रास होत होता. जिग्नेशच्या सतत वादामुळे तिची प्रकृती बिघडत होती. त्यामुळे त्यांनी तिला जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी तीन ब्लॉकेज असल्याने तिचा हदय चालत नसल्याचे सांगितले होते. तिचे वय जास्त असल्याने डॉक्टरांनी त्यांना पेसमेकर बसविण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे डॉक्टराच्या सल्ल्यानुसार त्यांनी पालूबेन यांना पेसमेकर बसविला होता. मात्र थोडा जास्त आवाज आला की तिला पुन्हा श्‍वास घेण्याचा त्रास होत होता. त्यामुळे तिची घरातील सर्वजण काळजी घेत होते. शनिवारी टाभजी हे त्यांच्या पत्नीसोबत कामावर निघून गेले. दुपारी तीन वाजता त्यांची पत्नी घरी आली असता तिला घराला कुलूप लावल्याचे दिसून आले.

जिग्नेश कुलूप लावून घरातून निघून गेला असावा म्हणून तिने त्याची वाट पाहिली, मात्र बराच वेळ होऊन जिग्नेश घरी आला नाही. त्यामुळे त्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी त्यांना पालूबेन या जमिनीवरील गादीवर बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी तातडीने तिला नायर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच ताडदेव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला होता. दुसरीकडे पालूबेनच्या शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह टाभजी बाबरिया यांच्याकडे सोपविण्यात आला.

मात्र अंत्यविधीनंतरही जिग्नेश हा घरी आला नव्हता. ११ ऑगस्टला जिग्नेशला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळी त्याने ८ ऑगस्टला सकाळी साडेदहा वाजता दारुच्या नशेत घरी आला होता. त्याने पालूबेनकडे दारुसाठी पैशांची मागणी केली. तिने त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे तो तिच्याशी वाद घालू लागला. जोरजोरात भांडण करुन त्याने तिची गळा दाबून हत्या करण्याची धमकी दिली होती. या धमकीचा तिने प्रचंड धसका घेतला आणि त्यात ती बेशुद्ध झाली होती. त्याने तिला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिची काहीच हालचाल नव्हती. त्यानंतर त्याने तिच्या कानातील कर्णफुले, बोटातील अंगठी काढून घराला बाहेरुन कुलूप लावून पलायन केले होते.

वेळीच औषधोपचार न मिळाल्याने पालूबेन यांचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूस जिग्नेशच जबाबदार असल्याचे तपासात उघडकीस आले होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर जिग्नेशविरुद्ध पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला शनिवार १५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page