बोगस मोबाईल विक्री करुन फसवणुक करणार्या दुकलीस अटक
ऍमेझॉनसह ग्राहकांची आर्थिक फसवणुक केल्याचे उघडकीस
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१४ ऑगस्ट २०२६
मुंबई, – बोगस मोबाईल विक्री करुन फसवणुक करणार्या एका दुकलीस गावदेवी पोलिसांनी अटक केली. मिलन धनश्यामभाई देवमुरारी आणि प्रविणकुमार रुपचंद्र तांती अशी या दोघांची नावे असून या दोघांकडून दहापैकी चार मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या दोघांनी ऍमेझॉनसह ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर दोन्ही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
नवीन पोपटलाल शहा हे मोबाईल व्यावसायिक असून वरळी येथे राहतात. त्यांचा गावदेवी येथील पेडर रोडवर फ्रिलान्स नेटवर्क नावाचे एक मोबाईल विक्रीचे शॉप आहे. त्यांच्या शॉपमध्ये विविध कंपन्याच्या मोबाईलची विक्री होते. अनेकदा ते ऍमेझॉन, फ्लिपकार्ट या ऑनलाईन कॉमर्स वेबसाईटवरुन मोबाईल विक्री करतात. ऑनलाईन मोबाईलची ऑर्डर आल्यानंतर त्यांच्या शॉपमधून बॉक्समध्ये मोबाईल पॅक करुन ते भिवंडीतील ऍमेझॉन वेअर हाऊसला पाठविले जाते. मे २०२४ ते २२ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत देशभरात वेगवेगळ्या शहरात त्यांच्या शॉपमधून साडेनऊ लाखांचे दहा मोबाईल पाठविण्यात आले होते. या मोबाईलची ग्राहकांना डिलीव्हरी करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित ग्राहकांनी ऍमेझॉन आणि नंतर त्यांच्या कंपनीला पेमेंट पाठविले होते.
मात्र काही ग्राहकांना मूळ मोबाईलऐवजी बोगस मोबाईल पाठविण्यात आले होते. त्यामुळे ग्राहकांनी त्यांची ऑर्डर रद्द केली होती. भिवंडीतील वेअर हाऊसमध्ये मूळ मोबाईल काढून त्यात बोगस मोबाईल ठेवून अज्ञात व्यक्तीने संबंधित बोगस मोबाईलची ग्राहकांना डिलीव्हरी केली होती. त्यामुळे त्यांचे साडेनऊ लाखांचे आर्थिक नुकसान झाले होते. या संपूर्ण प्रकरणात ऍमेझॉनच्या काही डिलीव्हरी बॉयचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करुन नवीन शहा यांनी गावदेवी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अपहारासह फसवणुक व अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.
गेल्या सात महिन्यांपासून गुन्ह्यांतील आरोपींचा पोलीस शोध घेत होते. ही शोधमोहीम सुरु असताना पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त सुमन चव्हाण, वरिष्ठ पोली निरीक्षक प्रशांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप देसाई, पोलीस उपनिरीक्षक विरेंद्रसिंग खंडाडे, पोलीस हवालदार राजन परब, शैलेश कदम, अभिजीत जाधव, पोलीस शिपाई विनोद शिंदे, दिपक करंबळकर, अभिजीत कर्चे, जगदेश आदी पथकाने वेगवेगळ्या परिसरातून मिलन देवमुरारी आणि प्रविण तांती या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यांच्याकडून पोलिसांनी दहापैकी चार मोबाईल हस्तगत केले आहे. उर्वरित सहा मोबाईल सध्या कोणाच्या वापरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन्ही आरोपी ऍमेझॉनवर मोबाईल ऑर्डर करुन मोबाईल फोन काहीतरी बहाण्याने रिर्टन करताना दुसरेच कमी दर्जाचे फोन परत करत होते. मूळ मोबाईलची संपूर्ण रक्कम परत मिळवून मोबाईल व्यावसायिकासह ऍमेझॉनची फसवणुक करत होते. तपासात ही बाब उघड होताच या दोघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना गिरगाव येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.