मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१५ ऑगस्ट २०२६
मुंबई, – धारावी परिसरात कांदिवली युनिटच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलने एका विशेष कारवाईत दोन एमडी ड्रग्ज तस्करांना गजाआड केले. जावेद गफार अली आणि महिर तसक अली अशी या दोघांची नावे असून ते दोघेही धारावीतील रहिवाशी आहेत. या दोघांकडून पोलिसांनी १ कोटी ७५ लाख ६० हजार रुपयांचा ४३९ ग्रॅम वजनाचे एमडी, १६ हजार ९२० रुपयांचा ४२३ ग्रॅम गांजा आणि ४० हजार रुपयांचे दोन मोबाईल असा १ कोटी ७६ हजार १६ हजार ९२० रुपयांचा साठा जप्त केला आहे. या दोघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्यांना शनिवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचे नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल लोखंडे, पोलीस निरीक्षक अभय दंडगव्हाळ यांच्या आदेशावरुन कांदिवली ऍण्टी नारकोटीक्स सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नाईक, पोलीस उपनिरीक्षक अविनाश दराडे, निखील शेळके, सहाय्यक फौजदार विनोद निकम, पोलीस हवालदार देसाई, चौधरी, तांबोळी, राणे, पोलीस शिपाई रोकडे, मोरे, नेहे आदी पोलीस पथक धारावी परिसरात गस्त सुरु केली होती. शनिवारी रात्री धारावीतील होळी मैदान परिसरात गस्त घालताना पोलिसांना दोन तरुण संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आले. या दोघांनाही पोलिसांनी थांबविण्याचा इशारा केला, मात्र साध्या वेशातील पोलिसांना पाहताच ते दोघेही पळू लागले. यावेळी पोलिसांनी या दोघांनाही पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना अनुक्रमे ३६ लाख ४० हजार ९१ ग्रॅम तर ३० लाख रुपयांचा ७५ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले.
या दोन्ही कारवाईत पोलिसांनी १ कोटी ७६ हजार १६ हजार ९२० रुपयांचा एमडी, गांजा आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. चौकशीत ते दोघेही धारावी परिसरात राहत असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्याच्या राहत्या घराची पोलिसांनी झडती घेतली होती. तिथे पोलिसांना १ कोटी ९ लाख रुपयांचा एमडी आणि १६ हजार ९२० रुपयांचा गांजा सापडला. हा सर्व मुद्देमाल जप्त केल्यानंतर त्यांना कांदिवली युनिटच्या कार्यालयात आणण्यात आले होते. चौकशीत जावेद आणि महिर हे दोघेही एमडी ड्रग्ज तस्करी करत असल्याचे उघडकीस आले.
धारावी परिसरात ते दोघेही ड्रग्जची डिलीव्हरीसाठी आल होते, मात्र त्यापूर्वीच या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या दोघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यांनी यापूर्वीही ड्रग्जची विक्री केली आहे, त्यांना ते ड्रग्ज कोणी दिले, कोणाला देण्यासाठी ते दोघेही एमडी ड्रग्ज घेऊन आले होते, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलिसाकडून तपास सुरु आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश दराडे हे करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.