मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ ऑगस्ट २०२६
मुंबई, – पत्नीसह दोन मुलांवर विषप्रयोग करुन एका ३० वर्षांच्या नौदलाच्या खलाशाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दक्षिण मुंबईतील कफ परेड येथील नेव्हीनगर परिसरात उघडकीस आली आहे. मृतांमध्ये पुरणमल शंभूलाल मेहता, त्याची पत्नी ओमा पुरणमल मेहता, तीन वर्षांचा मुलगा यश पुरणमल मेहता आणि सहा महिन्यांचा मुलाचा समावेश आहे. शवविच्छेदन अहवालात पत्नीसह दोन्ही मुलांवर विषप्रयोग झाल्याचे उघडकीस आले असून पुरणमलने आत्महत्या करुन स्वतचे जीवन संपविले. या घटनेमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
मेहता कुटुंबिय नेव्हीनगर परिसरातील एका इमारतीमध्ये राहत होते. पुरमणल हा नौसेनेत खलाशी म्हणून काम करत होता. शनिवारी पुरणमल याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तसेच त्याची पत्नी आणि दोन्ही मुले बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर कफ परेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
या वौघांनाही तातडीने जवळच्या जे. जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. त्यानंतर त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते. रात्री उशिरा पोलिसांना त्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात ओमासह दोन्ही मुलांवर विषप्रयोग झाल्याचे उघडकीस आले होते. या तिघांच्या मृत्यूनंतर पुरणमल मेहता याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत कफ परेड पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर त्यांच्या परिचित काही व्यक्तींची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली आहे. मात्र या जबानीतून या घटनेमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. मेहता कुटु्रंबियांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समजू शकले नाही. या संपूर्ण प्रकरणाचा कफ परेड पोलिसांकडून तपास सुरु आहे. दरम्यान शनिवारी उघडकीस आलेल्या या घटनेने नेव्हीनगर परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.