घातक शस्त्रे विक्रीसाठी आलेल्या ३४ वर्षांच्या आरोपीस अटक
आरोपींकडून देशी पिस्तूलसह सहा जिवंत काडतुसे जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ ऑगस्ट २०२६
मुंबई, – दहिसर चेकनाका परिसरात घातक शस्त्रे विक्रीसाठी आलेल्या एका ३४ वर्षांच्या आरोपीस दहिसर पोलिसांनी अटक केली. संदीप रमाशंकर उपाध्याय असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहे. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही वर्षांत इतर राज्यातून मुंबई शहरात घातक शस्त्रे आणून त्याची विक्री होत होती. त्यामुळे अशा आरोपीविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना दहिसर चेकनाका परिसरात काहीजण घातक शस्त्रे घेऊन येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक इंद्रजीत पाटील यांना मिळाली होती. ही माहिती वरिष्ठांनी दिल्यानंतर त्यांनी संबंधित माहितीची शहानिशा करुन आरोपीविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, सहाय्यक पोलीस आयुक्त जयराज रणवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती सांगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक् इंद्रजीत पाटील, सहाय्यक फौजदार राजू नार्वेकर, पोलीस हवालदार ऑस्कर कोलासो, चुंगीवडीयार, पोलीस शिपाई विलास आव्हाड, निलेश शनवार आदी पथकाने दहिसर चेकनाका परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती.
शुक्रवारी सायंकाळी तिथे संदीप उपाध्याय हा आला होता, त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक देशी बनावटीचे पिस्तूल, सहा जिवंत काडतुस सापडले. ते पिस्तूल जप्त करुन त्याला पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्याविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.
तपासात संदीप हा मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात राहत असून फेब्रिकेशनचे काम करतो. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला ते पिस्तूल कोणी दिले, पिस्तूल तो कोणाला देण्यासाठी आला होता. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.