साडेतीन कोटीच्या हेरॉईनसह २९ वर्षांच्या तरुणाला अटक
झटपट श्रीमंतीसाठी ड्रग्जचा पुरवठा करत असल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ ऑगस्ट २०२६
मुंबई, – साडेतीन कोटीच्या हेरॉईनसह एका २९ वर्षांच्या तरुणाला जोगेश्वरी येथून एमआयडीसी पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. तौशिक लियाकत काझी असे या आरोपीचे नाव असून तो गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अंधेरी परिसरात ड्रग्ज पुरवठा करत असल्याचे उघडकीस आले आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने ड्रग्जचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने गुरुवार २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबई पोलिसांनी शहरात ड्रग्ज विक्री करणार्या ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेतर्ंगत आतापर्यंत अनेक ड्रग्ज तस्करांवर कारवाई करुन त्यांच्याकडून पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. तरीही ड्रग्ज तस्करीचे प्रमाण कमी झालेले नाहीत. त्यामुळे पोलिसांची ही मोहीम सुरुच होती. ही मोहीम सुरु असताना एमआयडीसी पोलीस ठाण्याचे एक विशेष पथक शनिवारी रात्री उशिरा परिसरात गस्त घालत होते. ही गस्त सुरु असताना काहीजण जोगेश्वरी येथे ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.
या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनश्याम नायर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल करांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक उल्हास खोलम, पोलीस हवालदार गौतम बडे, बाबू येडगे, सचिन ठोंबरे, बिनल शिंगाणे आदी पथकाने जोगेश्वरी परिसरात गस्त सुरु केली होती. रात्री उशिरा जोगेश्वरीतील पूनमनगर, सहकारी भंडारचया बाजूला असलेल्या हेमंत करकरे गार्डनच्या गेटसमोर या पथकाला एक तरुण संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. त्यामुळे त्याला पळून जाण्याची कुठलीही संधी न देता या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले.
सुरुवातीला त्याने पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला. चौकशीत त्याचे नाव तौशिक काझी असल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडील सामनाची झडती घेतल्यानंतर त्यात पोलिसांना ३०२ गॅम वजनाचे हेरॉईन सापडले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत साडेतीन कोटी रुपये इतकी किंमत आहे. हा साठा जप्त केल्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याप्रकरणी पोलीस हवालदार गौतम बडे यांच्या तक्रारीवरुन तौशिक काझीविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टाने गुरुवार २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तौशिक हा अंधेरी येथे राहत असून त्याला ते हेरॉईन उत्तराखंड आणि राजस्थान येथून काहीजण आणून देत होते. त्यानतर तो अंधेरी परिसरात या ड्रग्जचा पुरवठा करत होता. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून तो ड्रग्ज तस्करीमध्ये सक्रिय होता. झटपट श्रीमंत होण्यासाठी तो ड्रग्ज विक्री करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उल्हास खोलम हे करत आहेत.
एमडी ड्रग्जच्या गुन्ह्यांत तडीपार गुन्हेगाराला अटक
दुसर्या कारवाईत मुबारक मोमीन खान ऊर्फ लालू नावाच्या एका तडीपार गुन्हेगाराला पवई पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एमडी ड्रग्जसहीत कॅश आणि मोबाईल असा ९ लाख ३७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवईतील आरे रोड, मोरारजीनगर, मोमीननगर परिसरात मुबारक हा राहत असून त्याला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी तडीपार केले होते. ही कारवाई सुरु असताना तो त्याच्या घराजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णा ठोंबरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, प्रकाश वाखारे, पोलीस शिपाई सौदाणे, रणजीत सातपुते, अलीम नुरानी, शिंदे यांनी तिथे पाळत ठेवून मुबारकला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना ८ लाख ८० हजाराचा ५५ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज, ४७ हजार ८५० रुपयांची कॅश आणि दहा हजाराचा मोबाईल असा ९ लाख ३७ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मुबारक हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध दहाहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध मुंबईसह उपनगरातून तडीपारची कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई सुरु असताना तो एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आले असताना त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
