वयोवृद्ध व्यावसायिकाला ब्लॅकमेल करुन ७५ लाखांची खंडणी वसुली

अश्‍लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरलची दिली होती धमकी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑगस्ट २०२६
मुंबई, – नवी मुंबईतील एका वयोवृद्ध व्यावसायिकाला ब्लॅकमेल करुन चारजणांच्या एका टोळीने खंडणी स्वरुपात ७५ लाख वसुल केल्याचा धक्कादायक प्रकार नागपाडा परिसरात उघडकीस आला आहे. आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. शफीक हनीफ शेख, मुस्कान रफिक शेख, मिनू मुमताज आणि राजेंद्र उत्तेकर अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांवर तक्रारदार व्यावसायिकाला त्यांचा अश्‍लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी केल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर या टोळीने त्यांच्या मालकीच्या कंपनीवर स्वतचा कब्जा केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

ही घटना १ फेब्रुवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत ग्रँटरोड येथील १९८ एम. टी अन्सारी मार्ग, अरब लेन, क्रिस्टल टॉवरच्या रुम क्रमांक ६०३ मध्ये घडली होती. ६५ वर्षांचे तक्रारदार व्यावसायिक असून सध्या ते नवी मुंबईतील खारघर, सेक्टर पाचमध्ये राहत असून त्यांची एक खाजगी कंपनी आहे. नागपाडा परिसरात त्यांच्या मालकीचे एक फ्लॅट आहे. सात वर्षांपूर्वी त्यांची शफीक शेखसह इतर आरोपीशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते सर्वजण चांगले मित्र झाले होते. काही दिवसांत त्यांच्या कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते. ते एकमेकांना नियमित भेटत होते.

याच दरम्यान शफीकने मिनूशी त्यांच्याशी अधिक जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. याच दरम्यान त्यांच्यात दोघांच्या संमतीने शारीरिक संबंध निर्माण झाले होते. या शारीरिक सबंधाचे शफीकसह इतर तिघांनी मोबाईलवरुन व्हिडीओ बनविले होते. या व्हिडीओच्य मदतीने त्यांनी त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्याकडे पैशांची मागणी करु लागले होते. त्यांनी पैसे दिले नाहीतर त्यांचा अश्‍लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. बदनामीच्या भीतीने त्यांनी आरोपींना टप्याटप्याने ७५ लाखांची खंडणीची रक्कम दिली होती. इतकेच नव्हे तर त्यांची कंपनी स्वतच्या कब्जात घेण्याचा प्रयत्न सुरु केला होता.

खंडणी स्वरुपात ७५ लाख रुपये देऊनही ते त्यांच्याकडे सतत पैशांची मागणी करुन त्यांना ब्लॅकमेल करत होते. त्यांच्या या ब्लॅकमेलला कंटाळून त्यांनी नागपाडा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून चारही आरोपींविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर शफीक शेख,मुस्कान शेख, मिनू मुमताज आणि राजेंद्र उत्तेकर या चारही आरोपींविरुद्ध पोलिसांनी अश्‍लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी करणे, खंडणी स्वरुपात ७५ लाख रुपये घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. शफीक आणि मुस्कान हे दोघेही नवी मुंबईतील खारघर तर राजेंद्र हा मुलुंड परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आरोपीचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे. या चौघांची लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page