चोरीच्या बाईकवरुन मोबाईल चोरी करणारा गजाआड

तीन बाईक तर सहा मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची उकल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ ऑगस्ट २०२६
मुंंबई, – चोरीच्या बाईकवरुन मोबाईल चोरी करणार्‍या एका रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला आंबोली पोलिसांनी अटक केली. अर्जुन ऊर्फ राजू सहानी ऊर्फ अर्जा असे या २६ वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी चोरीच्या तीन बाईक आणि अकरा मोबाईल असा तीन लाख साठ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

शैलेश जयराम यादव हा तरुण डिलीव्हरी बॉय असून तो जोगेश्‍वरीतील बेहराम बाग, रामकरण यादव चाळीत राहतो. १९ ऑगस्टला तो डिलीव्हरीसाठी अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स, सुंदरवन, हिरधाम इमारतीसमोर गेला होता. यावेळी त्याने त्याची बाईक तिथे पार्क करुन डिलीव्हरीसाठी गेला होता. काही वेळानंतर तो बाईकजवळ आला होता, यावेळी तिथे बाईक नव्हती. अज्ञात व्यक्तीने त्याची बाईक चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार उघडकीस येताच त्याने आंबोली पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी बाईक चोरीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता.

आरोपीचा शोध सुर असताना या गुन्ह्यांतील आरोपी अंधेरीतील वर्सोवा, म्हाडा परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्‍वर आवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण पाटील, पोलीस निरीक्षक सचिन बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक् प्रदीप फुंदे, पोलीस हवालदार विक्रम कुंभार, यादव मोरे, राजेंद्र चव्हाण, सागर चव्हाण, पोलीस शिपाई सचिन साखरे, योगेश नरळे यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल्या अर्जुन सहानीला पोलिसांनी ताब्यात घेतले.

तपासात अर्जुन हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध वर्सोवा पोलीस ठाण्यात सहा, आंबोली पोलीस ठाण्यात तीन, बांगुरनगर पोलीस ठाण्यात दोन, अंधेरी रेल्वे मोहीम, सांताक्रुज, कुरार, वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक अशा सोळा बाईकसह मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहे. तो चोरीच्या बाईकवरुन मोबाईल चोरी करत होता.

त्याच्याकडून पोलिसांनी तीन बाईक आणि अकरा चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत. तो सध्या अंधेरीतील चारबंगला, सिद्धार्थनगर, १९ क्रमांक सोसायटीमध्ये राहत होता. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page