शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने दहाजणांची ४६ लाखांची फसवणुक
आरोपी पती-पत्नीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० ऑगस्ट २०२६
मुंबई, – प्रति महिना तीन टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखवून शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीस प्रवृत्त करुन एका जोडप्याने दहाजणांची सुमारे ४६ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पवन गणेश सानिल आणि शामली पुजारी या आरोपी पती-पत्नीविरुद्ध मालवणी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनी सुरुवातीला दरमाह व्याजाची रक्कम देऊन तक्रारदारांना इतरांना शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन या सर्वांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. गुन्हा दाखल झाल्याने या दोघांनाही लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
६४ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार नोव्हील कॉनरड केनी हे मालाडच्या मालवणी परिसरात राहतात. ते गोदरेज कंपनीत शेफ म्हणून काम करत होते. मात्र आजारपणामुळे त्यांनी सप्टेंबर २०२० रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. ते स्नॅक्स बनवून विविध दुकानात विक्री करतात तर त्यांचे दोन्ही मुले खाजगी कंपनीत कामला आहे. २०२४ रोजी त्यांना पवनने कॉल केला होता. त्याने तो बजाज विमा कंपनीकडून बोलत असल्याचे सांगून त्यांना एक गुंतवणुक योजनेची माहिती दिली होती. यावेळी त्याने त्यांची वेळ घेतली होती. त्यामुळे त्यांनी त्याला त्यांच्या घरी बोलाविले होते. घरी आल्यानंतर पवनने त्यांना पाच वर्षांत गुंतवणुक रक्कम दुप्पट देण्याची एक योजना सांगितली होती. त्याची योजना चांगली वाटल्याने त्यांच्या मुलाने एका योजनेत गुंतवणुक करण्यास सुरुवात केली होती.
ही रक्कम त्याने त्यांना ठराविक महिन्यानंतर परत करुन त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यातून त्यांची ओळख झाली होती. गोदरेज कंपनीतून निवृत्ती झाल्यानंतर त्यांना पाच लाख रुपये मिळाले होते. ही माहिती पवनला माहित होती. त्यामुळे त्यांनी त्यांना शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर त्यांना हमखास चांगला परतावा मिळवून देतो असे सांगितले. गुंतवणुकीवर तीन टक्के मासिक व्याजदर देण्याचे आमिष दाखवून त्याने त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याच्याकडे तीन लाखांची गुंतवणुक केली होती.
या गुंतवणुकीवर त्याने त्यांना काही महिने व्याज दिले होते. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांची पत्नी लिंफिया केनीने तीन लाख, मुलगा नेव्हलीन केनीने सहा लाख, मुलगी मिखायल किनीने आठ लाख, कौटुंबिक मित्र केनेथ जॉन डिसुझा यांनी पाच लाख, रुबी जॉन डिसुझा हिने पाच लाख, जावई मॅशिओ ऍड्यू सॅटोसने सात लाख, मोठा भाऊ जॉर्ज केनीने तीन लाख, मुलग इद्यथ केनीने पाच लाख, ऍस्ट्रल गोम्सने एक लाख असे ४६ लाख रुपये गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर पवन आणि त्याची पत्नी शामली पुजारीने नियमित व्याजाची रक्कम दिली. मात्र नंतर त्यांनी व्याजाची रक्कम देणे बंद केले होते. विचारणा केल्यानंतर ते दोघेही त्यांना वेगवेगळे कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे त्यांच्या गुंतवणुकीची रक्कम मागण्यास सुरुवात केली,
मात्र त्यांनी त्यांना मूळ रक्कमही परत केली नाही. शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी घेतलेल्या सुमारे ४६ लाखांचा परस्पर अपहार करुन आरोपी पती-पत्नीने दहाजणांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बोरिवलीतील लोकल कोर्टात एक खाजगी याचिका करुन पोलिसांना तपास करुन संबंधित आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली होती. या याचिकेवर अलीकडेच सुनावणी पूर्ण होऊन कोर्टाने मालवणी पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन आरोपीविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर नोव्हील कॉनरड केनी यांच्यासह इतर नऊजणांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पवन सानिल आणि त्याची पत्नी शामली पुजारी यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार असून या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचाही पोलिसांकडून तपास सुरु आहे.