मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० ऑगस्ट २०२६
मुंबई, – रस्त्यावर पार्क केलेल्या बाईक चोरी करणार्या एका रेकॉर्डवरील सराईत टोळीचा दहिसर पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी पाचजणांना पोलिसांनी अटक केली असून त्यात एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. इतर आरोपींमध्ये रोनित भास्कर शेट्टी, पंकज संगलाप्रसाद गुप्ता, आशुतोष संतोष दुबे आणि पिंटू छोटेलाल गुप्ता यांचा समावेश असून ते सर्वजण दहिसरचे रहिवाशी आहे. या आरोपींच्या अटकेने आठ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी २४ बाईकचे नंबर प्लेटस, इंजिन तसेच इतर पार्टस हस्तगत केले आहेत.
यातील तक्रारदार दहिसर येथे राहत असून त्यांच्या मालकीची एका बाईक आहे. २० ऑगस्टला ही बाईक त्यांनी दहिसर येथील अशोकवन, शिव वल्लभ रोड, देसाई चाळीजवळ पार्क केली होती. दुसर्या दिवशी ते बाईक घेण्यासाठी गेले होते, यावेळी ती बाईक तिथे नव्हती. रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीने बाईक चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी दहिसर पोलिसांत बाईक चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.
गेल्या काही महिन्यांत मुंबई शहरात बाईक चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे या गुन्ह्यांतील आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर तीन अज्ञात तरुण बाईकला धक्का मारुन नेत असल्याचे दिसून आले. या फुटेजमध्ये त्यांनी ती बाईक दहिसर येथील साईबाबा मंदिर रोडजवळ पार्क केली होती. गुन्ह्यांतील आरोपी आनंदनगर परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.
या माहितीची शहानिशा करण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, सहाय्यक पोलीस आयुक्त जयराज रणवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती सांगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत गिते, पोलीस हवालदार सागर पवार, अमोल जाधव, अमीत पाटील, शहानवाज सय्यद, पोलीस शिपाई सुशांत जाधव, कपिल चौधरी, महेंद्र महाले, ओमकार राणे यांनी आनंदनगर येथून पाचजणांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यांनी बाईक चोरी केल्याची कबुली दिली. बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील संबंधित रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. तीन ते चार दिवस रेकी केल्यानंतर ते रात्रीच्या वेळेस बाईक चोरी करत होते. त्यानंतर ती बाईक ते स्क्रॅप करणार्या आरोपींना विक्री करत होते. त्यामुळे पोलिसांनी स्क्रप करणार्या आरोपीच्या गोदामात छापा टाकून तेथून २४ बाईकच्या नंबर प्लेटस, इंजिन, चेसीस आणि इतर पार्टस हस्तगत केले.
या आरोपींच्या अटकेने बाईक चोरीच्या आठ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना शश आले आहे. त्यात दहिसर चार, एमएचबी दोन, कस्तुरबा आणि मालवणी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एका गुन्ह्यांचा समावेश आहे. अटकेनंतर या सर्वांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.