भरवेगात जाणार्‍या कारची बाईकसह रिक्षांना धडक लागून अपघात

अपघातात महिलेचा मृत्यू तर इतर पाचजणांना किरकोळ दुखापत

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ऑगस्ट २०२६
मुंबई, – भरवेगात जाणार्‍या एका कारची बाईकसह तीन रिक्षांना धडक लागून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर इतर पाचजणांना किरकोळ दुखापत झाली होती. मृत महिलेचे नाव प्रियांका मयांक सात्रा असून तिच्या मृत्यूप्रकरणी कृष्णा शांताराम चमणकर या ७० वर्षांच्या वयोवृद्ध कारचालकाला मालाड पोलिसांनी अटक केली आहे. जखमींवर कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक औषधोपचार करण्यात आले असून उपचारानंतर सर्वांना सोडून देण्यात आले आहे. या अपघातामुळे एका बाईकसह तीन रिक्षांचे प्रचंड नुकसान झाले होते.

हा अपघात रविवारी रात्री आठ वाजता मालाड येथील एस. व्ही रोड, मामलेदारवाडी रोड जंक्शन परिसरात झाला. रविवारी रात्री मालाड पोलिसांना कंट्रोल रुममधून एक कॉल प्राप्त झाला होता. त्यात मामलेदारवाडी जंक्शनजवळ एक अपघात झाला असून तिथे प्रचंड गर्दी झाली आहे. या माहितीनंतर मालाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिथे गेल्यानंतर पोलिसांना एक कारने एका बाईकसह तीन रिक्षांना धडक दिल्याचे दिसून आले.

या अपघातात मयांक, त्यांची पत्नी प्रियांका तसेच इतर तीन रिक्षाचालक व प्रवाशी असे चारजण जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरु असताना प्रियांका यांचा मृत्यू झाला तर इतर पाचजणांवर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. या सर्वांना नंतर सोडून देण्यात आले होते.

या अपघाताला जबाबदार असलेल्या कृष्णा चमणकर या वयोवृद्धाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याविरुद्ध हलगर्जीपणाने कार चालवून एका महिलेच्या मृत्यूस तर इतर पाचजणांना गंभीर दुखापत होण्यास, त्यांच्या वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर कृष्णा चमणकर यांना पोलिसांनी अटक केली.

मयांक हे त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाड येथे राहत असून रविवारी ते त्यांची पत्नी प्रियांकासोबत कामानिमित्त बाहेर आले होते. काम संपल्यानंतर ते त्यांच्या बाईकवरुन घरी जात होते. यावेळी हा अपघात झाला होता. प्रियांका ही व्यवसायाने वकिल असल्याचे बोलले जाते. तिच्या अपघाती निधनाने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page