शेअर गुंतवणुकीच्या बहाण्याने एलआयसीच्या निवृत्त अधिकार्याला गंडा
९७ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ऑगस्ट २०२६
मुंबई, – पाच ते वीस टक्के परताव्याचे आमिष दाखवून एलआयसीमधून निवृत्त झालेल्या एका वयोवृद्धाची अज्ञात सायबर ठगांनी सुमारे ९७ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन अज्ञात सायबर इगाविरुद्ध उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या ठगांनी बोगस कंपनी सुरु करुन अनेकांना शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणुक केल्याचे बोलले जाते.
रघुनाथ शिना जतन हे ६१ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार गोरेगाव येथील उन्नतनगरात राहतात. ते एलआयसीमधून सेवानिवृत्त झाले असून त्यांची पत्नी चारुलता ही एका नामांकित बँकेत कामाला आहे. त्यांना शेअरमार्केटचे चांगले ज्ञानअ असून ते नियमित शेअरमध्ये ट्रेडिंग करतात. १७ जुलैला त्यांना सोशल मिडीयावर शेअरमार्केटसंबंधित एक जाहिरात दिसली होती. त्यात शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला फायदा होईल असे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी ती जाहिरात ओपन केली होती. याच दरम्यान त्यांना एका व्हॉटअप ग्रुपमध्ये ऍड करण्यात आले होते. या ग्रुपमध्ये १९५ सभासद होते, त्यातील बहुतांश सभसदांनी शेअरमध्ये गुंतवणुक केली होती,
या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा मिळत असल्याचे त्यांना दिसून आले होते. गु्रपमध्ये संजय सिंग हा त्यांच्या सभासदांना शेअरमार्केटची माहिती देत होता. कुठल्या शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला फायदा होईल याबाबत सांगत होता. गुंतवणुकीवर पाच ते वीस टक्के परतावा मिळत असल्याचा दावा संजय सिंग आणि राणी देशमुख यांनी केला होता. याच दरम्यान त्यांना राणी देशमुख हिने कॉल करुन शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देताना त्यांना चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. तिच्या आमिषाला बळी पडून ५ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध शेअरमध्ये ९७ लाख ७० हजार रुपयांची गुंतवणुक केली होती.
या गुतवणुकीवर त्यांना २० कोटी ६५ लाख ४२ हजार ३२३ रुपये फायदा झाल्याचे दिसून आले होते. त्यापैकी चार कोटी रुपये काढण्याची त्यांनी राणीला रिक्वेस्ट पाठविली होती. यावेळी तिने त्यांना ही रक्कम काढण्यासाठी त्यांना वीस टक्के सर्व्हिस टॅक्स म्हणजेच ३९ लाख ३६ हजार ११३ रुपये जमा करावे लागेल. ही रक्कम जमा केल्यानंतर त्यांना ही रक्कम मिळेल असे सांगितले. ही रक्कम देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे त्यांनी चार कोटीतून ही रक्कम काढून घेण्यास सांगितले. मात्र तिने सर्व्हिस टॅक्स भरल्याशिवाय त्यांना ही रक्कम मिळणार नाही असे सांगितले.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी गुगलवर संबंधित कंपनीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यात कंपनीचे कार्यालय फोर्ट परिसरात असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे ते तिथे गेले होते. मात्र तिथे त्यांना ती कंपनी नसल्याचे दिसून आले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर हेल्पलाईनसह उत्तर प्रादेशिक सायबर विभागात घडलेला प्रकार सांगून संबंधित सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या ठगांविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. रघुनाथ जतन यांनी ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर केली होती, त्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.