क्रिप्टो करन्सी देण्याच्या आमिषाने फसवणुक करणार्या दोघांना अटक
दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ऑगस्ट २०२६
मुंबई, – मार्केटपेक्षा कमी किंमत क्रिप्टो करन्सी देण्याचे आमिष दाखवून एका शेअर मार्केटिंग व्यावसायिकाची सुमारे २० लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी दोघांना अंधेरी पोलिसांनी अटक केली. संजय ऊर्फ मनोज तेजराज जैन आणि निलेश दामोदर कथपाल अशी या दोघांची नावे असून ते दोघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्यांच्याविरुद्ध मुंबईसह इतर शहरात अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पंकज धनश्याम जगासिया हे चेंबूर परिसरात राहत असून त्यांचा स्वतचा शेअर मार्केटिंगचा व्यवसाय आहे. त्यांना व्यवसायासह वैयक्तिक गुंतवणुकीसाठी युएसडीटी क्रिप्टो करन्सीची गरज होती. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. गेल्या वर्षी जुलै महिन्यांत त्यांची संजय जैन यांनी त्यांना क्रिप्टो करन्सीचे देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा मित्र दुबईत राहत असून त्याच्या मदतीने त्याने त्यांना मार्केटपेक्षा कमी किंमत युएसडीटी क्रिप्टो करन्सी देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला १९ लाख ७८ हजार रुपये एका अंगाडियामार्फत दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना करन्सी दिले नाही. विचारणा केल्यानंतर तो विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी अंधेरी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. हा गुन्हा ९ जुलै २०२५ ते १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत झाला होता. या दरम्यान पंकज जगासिया यांच्यासोबत आरोपींचे अनेकदा मोबाईलवर संभाषण झाले होते. हाच धागा पकडून पोलिसांनी आरोपींचे कॉल डिटेल्स प्राप्त केले होते. दुसरीकडे तक्रारदारासह साक्षीदार तसेच अंगाडिया यांचे जबानी नोंदवून आरोपींची जास्तीत जास्त माहिती तसेच त्यांच्याकडील सीसीटिव्ही फुटेजवरुन आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी अंगाडियाकडे कॅश घेण्यासाठी निलेश कथपाल हा आरोपी आल्याचे उघडकीस आले.
या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मचिंछर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक रोहन सुर्वे, पोलीस हवालदार पुजारी, शिंदे, घडवले, पोलीस शिपाई म्हात्रे, पाटील, लोंढे या पथकाने संजय जैन आणि निलेश कथपाल या दोघांनाही संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला आहे. या सर्वांनी मिळून पंकज जगासिया यांच्या पैशांची विल्हेवाट लावली होती. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
तपासात दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. यातील निलेश कथपालविरुद्ध एमआडीसी, साकिनाका, माटुंगा, नाशिक शहर मुंबईनाका, उपनगर, ओशिवरा, इगतपुरी पोलीस ठाण्यात अपहारासह फसवणुक, पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणुक करणे, बोगस दस्तावेज बनवून फसवणुक करणे आदी नऊ तर संजय जैन याच्याविरुद्ध एमआयडीसी, एल.टी मार्ग, मेघवाडी, वाकोला, मालवणी, ठाण्यातील वर्तकनगर, दादर, विलेपार्ले पोलीस ठाण्यात चोरीसह घरफोडी, अपहारासह फसवणुक, कट करुन रॉबरी करणे, धमकी देणे आदी आठ गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.