निवडणुक आयोगाचा प्रतिनिधी सांगून निवृत्त बँक अधिकार्‍याची फसवणुक

नावात दुरुस्तीच्या नावाने एपीके फाईल पाठवून सात लाखांना गंडा

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ऑगस्ट २०२६
मुंबई, – निवडणुक आयोगाचा प्रतिनिधी सांगून एका निवृत्त बँक अधिकार्‍याची अज्ञात सायबर ठगाने ऑनलाईन फसवणुक केल्याचा प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. नावात दुरुस्तीच्या नावाने त्यांना एपीके फाईल पाठवून सात लाखांना गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

६६ वर्षांचे शैलेश पांडुरंग कुलकर्णी हे दादरच्या हिंदू कॉलनी, आलाप सोसायटीमध्ये राहतात. ते एका खाजगी बँकेतून निवृत्त झाले असून सध्या घरीच असतात. त्यांचे त्यांची बहिण सुजाता पांडुरंग कुलकर्णीसोबत एका बँकेत दोन संयुक्त खाते आहे. त्याचा ते दोघेही नेट बँकिंगसाठी वापर करतात. २५ ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना एका अज्ञात मोबाईलवरुन एक मॅसेज आला होता. त्यावर प्रोफाईल फोटो निवडणुक निर्वाचन आयोगाचा होता. त्यात त्यांचे निवडणुक यादीतील नाव चुकले असून ते दुरुस्त करण्यासाठी त्यांनी मॅसेजमध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकाशी संपर्क साधावा असे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी त्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला,

यावेळी समोरुन बोलणार्‍या व्यक्तीने तो निवडणुक आयुक्त असल्याचे सांगून त्यांना व्हॉटअपवर एक फाईल पाठविली आहे. ती फाईल ओपन करुन त्यात त्यांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक भरुन पाच रुपये भरण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी ती फाईल ओपन केली. त्यात त्यांचे नाव, पत्ता, मोाबईल क्रमांक भरला आणि पाच रुपये ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला. मात्र पाच रुपये ट्रान्स्फर झाले नाही. त्यानंतर त्यांना एक एपीके फाईल पाठविली होती. ती ओपन करुन त्यांना पाच रुपये भरण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी एपीके फाईल ओपन करुन त्यात पाच रुपये ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर त्यांच्या मोबाईलमध्ये बँकेत काही मॅसेज येऊ लागले.

या मॅसेजची पाहणी केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून काही ऑनलाईन व्यवहार झाल्याचे दिसून आले. एकूण चार व्यवहार झाले होते, त्यात अज्ञात सायबर ठगाने सात लाख दोन हजाराचा अपहार केला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर हेल्पलाईनसह माटुंगा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून या ठगांचा शोध सुरु केला आहे. गेल्या काही दिवसांपासून अज्ञात व्यक्तीकडून निवडणुक आयोगाकडून मॅसेज आणि कॉल केले जात आहे. अशा लोकांनी पाठविलेले फाईल, लिंक किंवा एपीके फाईल ओपन करु नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page