दोन दिवसांपासून मिसिंग असलेल्या ३२ वर्षांच्या महिलेची हत्या
हत्येमागील कारण स्पष्ट नाही; अज्ञात आरोपीचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ सप्टेंबर २०२६
मुंबई, – दोन दिवसांपासून मिसिंग असलेल्या सुनिता गौतम मोरे या ३२ वर्षांच्या महिलेची अज्ञात व्यक्तीने हत्या करुन तिचा मृतदेह एका गाळ्यात ठेवून पलायन केल्याची घटना विक्रोळी परिसरात उघडकीस आली आहे. या हत्येमागील कारणांचा खुलासा होऊ शकला नाही. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
ही घटना २६ ऑगस्ट दुपारी दोन ते २९ ऑगस्ट दुपारी साडेबारा वाजता विक्रोळीतील कन्नमवार नगर क्रमांक दोन, मच्छिमार्केट परिसरातील एका बंद गाळ्यात घडली. ४० वर्षांचे गौतम सिद्धार्थ मोरे हे प्लंबर म्हणून काम करत असून सध्या विक्रोळीतील टागोरनगर परिसरात राहतात. मृत सुनिता ही त्यांची पत्नी असून गेल्या पाच वर्षांपासून ती केळी विक्रीचे काम करते. अनेकदा ती मच्छिमार्केटमधील होलसेल व्यापार्याकडून केळी विकत घेत होती. २६ ऑगस्टला गौतम हे नेहमीप्रमाणे त्यांच्या कामासाठी निघून गेले होते. दुपारी दोन वाजता सुनिता ही केळी विक्रीसाठी घरातून निघाली. मात्र रात्री उशिरापर्यंत ती घरी आली नाही. त्यामुळे त्यांनी तिच्या मोबाईवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मोबाईल रिंग वाजत होती, मात्र ती प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे त्यांनी सुनिताचा परिसरात शोध सुरु केला, मात्र ती कुठेच सापडली नाही.
दुसर्या दिवशी सकाळपर्यंत सुनिता घरी आली नव्हती. त्यामुळे ते मच्छिमार्केटमधील होलसेल केळी व्यापार्याकडे तिची चौकशीसाठी गेले होते. यावेळी त्यांनी सुनिता ही केळी घेण्यासाठी त्यांच्याकडे आली नसल्याचे सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी सुनिताचा बुलढाणा येथील खामगाव, वाकुड गावी राहणारा भाऊ अनिल शिरसाठ याला ही माहिती दिली. त्यानेही सुनिताला कॉल केल्याचे तसेच तिने त्याला प्रतिसाद दिला नसल्याचे सांगितले. त्यामुळे ते विक्रोळी पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सुनिताची मिसिंग तक्रार नोंदवून घेतली होती.
तिचा शोध सुरु असताना शनिवारी २९ ऑगस्टला दुपारी साडेबारा वाजता त्यांना विक्रोळी पोलिसांचा कॉल आला होता. त्यांना विक्रोळीतील मच्छिमार्केटमधील गाळ्यामध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी त्यांना तिथे बोलाविण्यात आले होते. त्यामुळे गौतम मोरे तिथे गेले होते. यावेळी तो मृतदेह त्यांच्या पत्नीचा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. प्राथमिक तपासात सुनिताची अज्ञात व्यक्तीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
तिला गोड बोलून त्याने तिला गाळ्यात बोलावून नंतर तिची हत्या करुन मृतदेह तिथे टाकून आरोपीने पलायन केले होते. सुनिताला शेवटचे एका रिक्षाचालकासोबत काहींनी बघितले होते, त्यामुळे या रिक्षाचालकाचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. याप्रकरणी गौतम मोरे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोेंदवून तपास सुरु केला आहे. दरम्यान दोन दिवसांपासून मिसिंग असलेल्या सुनिताची हत्या झाल्याचे समजताच स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.